एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होते नाव : पुणे पोलिसांच्या कोठडीतून केले होते पलायन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वातंत्र्य दिन सोहळ्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने शुक्रवारी इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला जेरबंद केले आहे. या दहशतवाद्याचे नाव रिजवान अली असून तो दिल्लीच्या दरियागंज येथे राहत होता. रिजवान हा इस्लामिक स्टेटच्या पुणे मॉड्यूलचा हिस्सा होता आणि एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत सामील होता. जुलै 2023 मध्ये तो पुणे पोलिसांच्या कोठडीतून पळाला होता. एनआयएने रिजवानवर 3 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
रिजवानला शुक्रवारी सकाळी दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळ्यासह पकडण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी रिजवान हा दिल्लीत राहत असल्याने तो एखाद्या हल्ल्याची तयारी करत होता असे मानले जात आहे. त्याच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एनआयएने यापूर्वी फरार वाँटेडसोबत रिजवानी अलीचे छायाचित्रही जारी केले होते. यात एकूण 4 दहशतवादी होते. यातील मोहम्मद शहनवाजला मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल्ला फैयाज उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे. तल्हा लियाकतसंबंधी अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
रिजवानचे नेटवर्क संपुष्टात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दिल्लीत 15 ऑगस्ट रोजीच्या सोहळ्यापूर्वी रिजवानला झालेली अटक महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. तर दिल्ली पोलिसांकडून गुरुवारीच अल-कायदा आणि खलिस्तानी दहशतवाद्यांची पोस्टर्स झळकविली होती. या पोस्टर्समध्ये 15 दहशतवाद्यांचा उल्लेख असून यातील 6 जण अल-कायदाशी संबंधित होते.
78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलीस अन्य सुरक्षा दल अलर्टवर आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानीच्या कानाकोपऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









