तालिबानला मोठे यश ः भारतीय दहशतवादीही मारला गेला
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानला इस्लामिक स्टेटच्या विरोधात मोठे यश मिळाले आहे. तालिबानने इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताच्या गुप्तचर आणि सैन्यप्रमुख कारी फतेहचा खात्मा केला आहे. कारी फतेह हा पाकिस्तानी, चिनी अधिकारी तसेच मशिदींवरील हल्ल्यामागील सूत्रधार हात. काबूलच्या खैर खाना भागात सोमवारी रात्री चाललेल्या मोहिमेत आयएसकेपीच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. कारी फतेहचा खात्मा हे तालिबानचे मोठे यश मानले जात आहे.
आयएसकेपीचा कमांडर कारी फतेह हा अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांताचा रहिवासी हाता. यापूर्वी तो आयएसकेपीचा अमीर-अल-हर्ब राहिला आहे. तालिबानने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या सैन्यमोहिमेत आयएसकेपीच्या हिंद प्रॉविन्स डिव्हिजनचा दहशतवादी इजाज अमीन अहनगर मारला गेल्याचा दावा केला होता. अमेरिकेने अलिकडेच एका अहवालात इस्लामिक स्टेटचे 3 हजार दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रीय असल्याचे नमूद केले आहे.
इस्लामिक स्टेटचे हे दहशतवादी अफगाणिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत. कारी हा अफगाणिस्तानात आयएसचा गुप्तचर तसेच कारवायांचा प्रमुख होता, कारी फतेह हा चीन आणि पाकिस्तानचे दूतावास तसेच मशिदीवरील हल्ल्यांचा सूत्रधार होता असा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद्दीनने सांगितले आहे. तर आयएसकेपीने कारीच्या मृत्यूची पुष्टी दिलेली नाही.
अन्य एका मोहिमेत आयएसकेपीचा भारतीय उपखंडासाठीचा प्रमुख इजाज अमीन अहनगर मारला गेल्याची पुष्टी तालिबानने दिली आहे. इजाजने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. आयएसकेपीच्या अनेक विदेशी दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले.









