भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची माहिती : रथयात्रेच्या निमित्ताने अनेक समित्या नियुक्त
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने 27 वी हरेकृष्ण रथयात्रा येत्या शनिवार व रविवारी भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून हजारो भक्तगण भाग घेणार आहेत, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. इस्कॉनच्या रथयात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, पाटणा येथे सर्वप्रथम इस्कॉनची रथयात्रा सुरू झाली. सुऊवातीला यात्रेमध्ये केवळ मोजकेच लोक सहभागी व्हायचे. पण त्यानंतर हजारो लोकांचा सहभाग वाढला असून आता ही यात्रा जगातील अनेक देशांमध्ये दरवषी साजरी केली जाते. बेळगावमध्ये या रथयात्रेची सुऊवात 1998 साली करण्यात आली. गेल्या 27 वर्षांपासून ही रथयात्रा अखंडपणे सुरू आहे. येथेही सुऊवातीला फक्त शहरातील काही भक्त सहभागी व्हायचे. मात्र, आता या रथयात्रेचे लोण जिह्यातच नव्हे तर देशभर पसरले असून देश-विदेशांतून भक्त रथयात्रेत दरवषी सहभागी होत आहेत.
ओरिसाचे जगन्नाथ मंदिर हे चार पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे श्री कृष्णासह श्री हरी विष्णूचा आठवा अवतार, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. एकदा सुभद्रादेवीने आपल्या बंधुंना मावशीच्या घरी गुंडीचा येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान जगन्नाथ व भगवान बलभद्र यांनीही तिच्याबरोबर रथातून जाण्याचे ठरविले आणि तेथे त्यांनी सात दिवस वास्तव्य केले. तेव्हापासून ही यात्रा सुरू असल्याची आख्यायिका ऐकावयास मिळते.
जगन्नाथाचे मुख्य मंदिर ओरिसातील पुरी येथे आहे, जे पुऊषोत्तम पुरी म्हणूनही ओळखले जाते. राधा आणि श्रीकृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वत: श्री जगन्नाथ आहेत. ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धाकृती मूर्ती स्थापित केल्या आहेत, ज्या इंद्रद्युम्न राजाने बांधल्या होत्या. भगवानांची रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे सुरू होते आणि दशमी तिथीला समाप्त होते. श्री राधागोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य मंडप उभारण्यात येत असून तेथे भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो-सेवा स्टॉल, आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल राहणार आहेत. मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. रथयात्रेच्या निमित्ताने अनेक समित्या नियुक्त करण्यात आल्या असून त्या जोमाने कामास लागल्या आहेत. या पत्रकार परिषदेच्या वेळी समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड व ज्येष्ठ भक्त एच. डी. काटवा उपस्थित होते. वरील सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
बेळगावातील यंदाचा रथयात्रा कार्यक्रम
शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.45 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे भाविकांचा मेळावा, दुपारी 1.30 वाजता देश-विदेशांतून आलेल्या ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती व मिरवणुकीला सुऊवात.
रथयात्रा मार्ग
धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, शनिवार खुट, गणपत गल्ली, माऊती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्लीमार्गे रेल्वे ओव्हरब्रीजवरून कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेसमार्गे इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानावर संध्याकाळी 6.30 वा. पोहचल्यानंतर कीर्तन, ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसाद. रथयात्रेमध्ये सजविलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी होणार आहेत. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे. संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे.
रविवारचे कार्यक्रम
रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 ते 5.30 पर्यंत नृसिंह यज्ञ ज्यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात. 6.30 ते 10 पर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यालिला आणि सर्वांसाठी महाप्रसाद.









