नूंह :
हरियाणातील आणखी एका इसमाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हरियाणात आतापर्यंत 5 तर केवळ नूंह जिल्ह्यात 2 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी युट्यूबर ज्योति मल्होत्राला हिसार तर अरमानला नूंह येथून पकडण्यात आले होते. हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नूंहच्या कंगारका गावातून तारीफ नावाच्या आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तारिफसोबत पाकिस्तानी दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविला आहे. तारीफ हा व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी दूतावासात काम करणारे दोन पाकिस्तानी नागरिक आसिफ बलोच आणि जाफर यांना भारताच्या सैन्य हालचालींसंबंधी गुप्त माहिती पाठवित होता. या माहितीच्या बदल्यात त्याला पैसे दिले जात होते.
चॅट डिलिट करण्याचा प्रयत्न
गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी तारीफला अटक केली आहे. पोलिसांना पाहताच तारीफने स्वत:च्या मोबाइलमधील काही चॅट डिलिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु टीमने मोबाइल जप्त करत तपास सुरु केला आहे. तपासात त्याच्या मोबाइलमध्ये पाकिस्तानी क्रमांकांसोबत करण्यात आलेले चॅटिंग, फोटो, व्हिडिओ आणि सैन्य हालचालींशी संबंधित छायाचित्रे मिळाली आहेत. तारीफ दोन वेगवेगळ्या सिमकार्डद्वारे पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होता. तारीफने पाक दूतावासात तैनात आसिफ बलोच आणि जाफरला भारताची गुप्त माहिती पुरवून देशाच्या सुरक्षेला धोक्यात टाकले होते.
दोनवेळा पाकिस्तानचा दौरा
पाकसाठी हेरगिरी करण्याप्रकरणी पकडण्यात आलेला मोहम्मद तारीफ डॉक्टरचे काम करायचा. त्याच्याकडे डॉक्टरची पदवी आहे की नाही, याचाही तपास केला जातोय. तारीफ आतापर्यंत दोनवेळा पाकिस्तानात जाऊन आला आहे.









