वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी मोकाट सुटले असून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्या नेतृत्वातील सरकार त्यांना नियंत्रणात ठेवण्यास असमर्थ ठरत आहे. गुप्तचरांनी पुरविलेल्या माहितीनुसार आता कॅनडातील खलिस्तानवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचे साहाय्य मिळत आहे.
कॅनडातील खलिस्तानी गटांनी आता विद्यार्थ्यांना लक्ष्य बनविण्यास प्रारंभ केला आहे. कॅनडात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याच देशात कायमचे वास्तव्य करण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून त्या मोबदल्यात पैसे गोळा केले जात आहेत. या पैशाचा उपयोग भारतविरोधी प्रचारासाठी केला जात आहे.
राजकारणातही प्रवेश
खलिस्तानवाद्यांनी आता कॅनडाच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. त्यांनी लिबरल पार्टी आणि न्यू डेमॉव्रेटिक पार्टी असे राजकीय पक्ष स्थापन केले असून या पक्षांना सातत्याने पाकिस्तानच्या आएसआयकडून अर्थसाहाय्य दिले जाते. कॅनडातील व्हँक्युव्हर हे आता खलिस्तानवाद्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. कॅनडातील प्रशासन या घडामोडींकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी गुप्तचरांनी माहिती दिली आहे.
शेतकरी आंदोलनात हात
भारत सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाची सूत्रे पाकिस्तान आणि कॅनडामधून हलविली गेली होती. या देशांमधील सरकारांनी या आंदोलनाला पैसा पुरविला होता आणि खलिस्तानवाद्यांचे हस्तक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांच्याच एका हस्तकाने दिल्लीत लाल किल्याजवळ खलिस्तानचा झेंडा फडकाविला होता, अशीही माहिती गुप्तचरांना मिळाल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
नशाखोरांचे साहाय्य
कॅनडामधील गटांनी भारतातील पंजाब राज्यात नशाखोर तरुणांशी संपर्क केला आहे. अमली पदार्थांचे व्यसन जडलेल्या तरुणांना हे पदार्थ पुरवून त्यांच्याकडून भारताविरोधी कृत्ये घडविली जात आहेत. असे तरुण अमली पदार्थांच्या सेवनाशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे हे पदार्थ मिळविण्यासाठी ते काहीही करावयास तयार असतात. याचाला लाभ कॅनडातील खलिस्तानवादी गटांकडून घेतला जात असून कॅनडाचे सरकार या सर्व कृत्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
कॅनडातील राजकारण
कॅनडामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. कॅनडाच्या लोकसंख्येच्या जवळपास 16 टक्के संख्या ही भारतीय वंशाच्या लोकांची आहे. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये शीखांची संख्या अधिक आहे. या शीखांपैकी कॅनडामध्ये बऱ्याच वर्षांपासून स्थायिक असणाऱ्यांचा खलिस्तानवाद्यांना पाठिंबा नाही. तथापि, काही तरुण कट्टर खलिस्तानवादी बनले आहेत. कॅनडात शीखांची संख्या जास्त असल्याने ते तेथील राजकारणावर प्रभाव टाकू शकतात. खलिस्तानवाद्यांना हाताशी धरले तर शीखांची मते मिळून सत्ता मिळू शकते असे तेथील काही राजकीय पक्षांना वाटते. त्यामुळे कॅनडातील अनेक राजकीय पक्ष खलिस्तानवाद्यांच्या कारवायांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. दहशतवादाच्या धोक्यापेक्षा त्यांना सत्ताकारण अधिक प्रिय आहे, अशी माहिती गुप्तचरांनी मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे.
खलिस्तानवाद्यांना राजकारण्यांचे साहाय्य
ड कॅनडातील काही राजकीय पक्षांचे खलिस्तानवाद्यांशी लागेबांधे
ड पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेचे दहशतवाद्यांना अर्थसाहाय्य
ड जस्टीन ट्रूडो यांच्या भारतविरोधामागे तेथील स्थानिक राजकारण









