पाकिस्तानला माहिती पुरविल्याचे धागेदोरे
► वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कच्छमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) काम करणाऱ्याचे हेरगिरीचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणी विशाल बडिया नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका मोठ्या हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची (बीएसएफ) गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचे धागेदोरे सापडल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
विशाल बडिया हा अदिती नावाच्या तऊणीच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तो बीएसएफमधील एका विभागात कार्यरत होता. मात्र, त्याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशालच्या मोबाईलवरून मिळालेल्या माहितीनुसार, तो आदितीच्या नावाने बनवलेल्या बनावट प्रोफाईलच्या संपर्कात होता. दोघांमध्ये सतत संवाद सुरू असल्याचे सोशल मीडियातील तपासाअंती स्पष्ट झाले आहे. विशाल याने कच्छ सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या पोझिशनची छायाचित्रे, नकाशे यासह अनेक महत्त्वाची माहिती पाठवली आहे. त्याबदल्यात त्याला 25 हजार ऊपयेही मिळाल्याचे समजते.









