राजीनाम्याची मागणी : काँग्रेसचे राज्यपालांना साकडे : कंत्राटदारही आक्रमक
प्रतिनिधी /बेंगळूर
हिंडलग्यातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडले असून राज्यपालांकडे निवेदन सादर करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच कंत्राटदार संघटनेनेही सरकारला ईश्वरप्पांवर कारवाई करा, अन्यथा कामे बंद ठेवू, असा इशारा दिला आहे. याचदरम्यान, भाजपश्रेष्ठीही या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ईश्वरप्पांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येला ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, तसेच त्यांना अटक करून भ्रष्टाचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद तसेच आमदारांच्या शिष्टमंडळाने राजभवनमध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्येआधी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या संदेशात आपल्या मृत्यूला ईश्वरप्पाच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला ईश्वरप्पाच थेट जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, असे निवेदन काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना दिले आहे. आत्महत्या केलेल्या संतोष पाटील यांनी कंत्राट घेऊन कामे पूर्ण केली आहेत.
ही सर्व कामे पूर्ण केल्यानंतरदेखील त्यांना संबंधित अधिकाऱयांनी बिले दिली नाहीत. या रकमेसाठी संतोष पाटील यांनी अधिकारी व मंत्र्यांशी संपर्क साधला असता आधी कमिशन देण्याची मागणी केली होती. याविषयी संतोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराजसिंग यांना पत्र पाठवून कमिशन गैरव्यवहाराची बाब निदर्शनास आणून दिली. तरीसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ईश्वरप्पा व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या छळामुळे संतोष यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे ईश्वरप्पांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
...अन्यथा 25 मे पासून कंत्राटी कामे महिनाभर बंद
मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याबरोबरच राज्य सरकारने कमिशनसारख्या गैरप्रकाराला चाप लावावा. अन्यथा 25 मे पासून राज्यभरात एक महिना सर्व प्रकारची कामे थांबविण्यात येतील, असा इशारा कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने दिला आहे.
चामराजपेठ येथील कंत्राटदारांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष डी. केंपण्णा यांनी, ईश्वरप्पांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. भाजपचे कार्यकर्ता असणाऱया कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी, आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत द्यावी. कंत्राटी कामांसाठी खर्च केलेली रक्कम त्वरित मंजूर करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या. धमक्यांविषयी संतोष यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्याशी फोनवरून चर्चा केली होती, असेही केंपण्णा यांनी सांगितले.
40 तासांनंतर शवविच्छेदन
कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सुमारे 40 तासांनी शवविच्छेदन करण्यात आले आहे. मंगळवारी उडुपीच्या शांभवी लॉजमध्ये संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास त्यांच्या पत्नीने आक्षेप घेतला होता. संतोष यांचे भाऊ येईपर्यंत मृतदेह लॉजमध्येच असू दे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी संतोष यांचा मृतदेह कडेकोट पोलीस बंदोबस्तात लॉजमधून उडुपीच्या लॉजमधून मणिपाल हॉस्पिटल शेजारी असलेल्या शवविच्छेदन केंद्रात नेण्यात आला.
काँग्रेसकडून संतोष यांच्या कुटुंबाला 11 लाखांच्या मदतीची घोषणा
उडुपीतील एका लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटुंबाला कर्नाटक काँग्रेसकडून 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने संतोष यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी. तसेच त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी. सध्या आपला पक्ष संतोष यांच्या पत्नील तात्पुरती नोकरी देईल, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.
आपल्याविरोधात षड्यंत्र…
आपल्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे. कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येमागे कोण आहे, याचा तपास झाला पाहिजे. सध्या आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्याशी चर्चा करून याविषयी माहिती दिली आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना आपल्यावर आरोप केले जात आहेत.
– के. एस. ईश्वरप्पा, ग्रामविकास-पंचायतराज मंत्री
तिघांविरुद्ध एफआयआर
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्याविरोधात उडुपी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे ईश्वरप्पांचे निकटवर्तीय बसवराज आणि रमेश यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.