फिडे रेटिंग बुद्धिबळ ः सहाव्या फेरीनंतर संयुक्त अग्रस्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
12 वर्षीय वंडरबॉय इशान तेंडोलकरने जायंट किलिंग कामगिरी पुढे चालू ठेवताना फिडे मानांकित बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत दुसरा मानांकित फिडे मास्टर सौरभ खेर्डेकरला पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे इशान पुन्हा अग्रस्थानी पोहोचला आहे.
अन्य तीन खेळाडूंसह 6 पैकी 5.5 गुण घेत तो संयुक्त आघाडीवर आहे. वरचे मानांकन असलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा अडचणीची ठरली असून 14 वर्षीय क्षौनिश जैस्वालने (1356 एलो रेटिंग) तिसऱया मानांकित राघव श्रीवास्तवचा (2066) पराभव केला. या विजयानंतर क्षौनिश 5 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. षन्मुख पल्ली (1545), दर्श शेट्टी (1534), मयुरेश पारकर (1372) यांनीही 5 गुण मिळविले आहेत.
आदल्या दिवशी संयुक्त आघाडीवर असलेल्या सौरभ खेर्डेकर (1722) व आयुष शिरोडकर (1533) यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. या दोघांसमवेत अग्रमानांकित आयएम विक्रमादित्य कुलकर्णी (2251) व इशान तेंडोलकर संयुक्त आघाडीवर आहेत. विक्रमादित्यने योहान बोरिचाचा पराभव करून पुन्हा तो चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आला आहे. एकूण 11 खेळाडू 4.5 गुणांसह संयुक्त तिसऱया स्थानावर आहेत. या स्पर्धेच्या आणखी तीन फेऱया बाकी असून खेळाडूंत पोडियमवर स्थान मिळविण्यासाठी जोरदार चुरस लागली आहे. या स्पर्धेसाठी एकूण 3 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.









