बांगलादेशवर 227 धावांनी दणदणीत विजय, कोहलीचे 72 वे शतक, मेहदी हसन मिराज मालिकावीर
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम
इशान किशनचे वनडे क्रिकेटमधील विक्रमी वेगवान द्विशतक आणि अनुभवी विराट कोहलीच्या 72 व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे भारताने यजमान बांगलादेशकडून संभाव्य व्हाईटवॉश टाळला. या मालिकेतील तिसऱया व शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 227 धावांनी दणदणीत पराभव मागील दोन पराभवाचा वचपा काढला. इशान किशनने 210 तर कोहलीने 113 धावा झळकविल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 8 बाद 409 धावांचा मोठा डेंगर उभारला. त्यानंतर बांगलादेशचा डाव 34 षटकात 182 धावात आटोपला. इशान किशन आणि विराट कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 290 धावांची विक्रमी भागीदारी केली. डावातील पाचव्या षटकातच सलामीचा शिखर धवन मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर 3 धावा जमवित पायचीत झाला. त्यानंतर इशान किशन आणि विराट कोहली या जोडीने तुफान फटकेबाजी करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात इशान किशनचे हे सर्वात जलद द्विशतक म्हणून नोंदविले गेले. त्याने 131 चेंडूत 10 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने 210 धावा झोडपल्या. या सामन्यात दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीत इशान किशनला धवनबरोबर सलामीला येण्याची संधी मिळाली होती. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. 24 वषीय डावखुरा फलंदाज इशान किशनने मैदानाच्या सर्व बाजूने फटके मारले. त्याने आपले द्विशतक 126 चेंडूत झळकवले.
वनडे क्रिकेटच्या प्रकारामध्ये इशान किशनचे हे सर्वात जलद द्विशतक आहे. यापूर्वी विंडीजच्या ख्रिस गेलने 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 138 चेंडूत द्विशतक नोंदविले होते. गेलचा हा विक्रम इशान किशनने मागे टाकला.
वनडेमधील भारताची 409 ही चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. शनिवारच्या सामन्यात इशान किशन आणि कोहली बाद झाल्यानंतर भारताचा धावांचा वेग मंदावला. 40 षटकाअखेर भारताने 3 बाद 339 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर शेवटच्या दहा षटकात भारताने 5 गडी गमावताना 70 धावांची भर घातली. इशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले शतक 85 चेंडूत पूर्ण केले. त्याने चौकार आणि षटकारांच्या रूपात 156 धावा जमविल्या. झारखंडच्या इशान किशनने बांगलादेशच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. भारताच्या डावातील 35 वे षटक मुस्तफिजूर रेहमानने टाकले. त्याच्या या षटकात एकेरी धाव घेत इशान किशनने आपले द्विशतक पूर्ण केले. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारा इशान किशन हा भारताचा चौथा फलंदाज तर एकूण सात फलंदाजांनी या क्रीडा प्रकारात द्विशतके झळकविली आहेत.
विराट कोहलीने 91 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 113 धावा जमविल्या. वनडे क्रिकेटमधील कोहलीचे हे 44 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे 72 वे शतक असून त्याने रिकी पाँटिंगला (71 शतके) मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे. कोहली आणि इशान किशन यांनी 190 चेंडूत 290 धावांची विक्रमी भागीदारी केली. या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अफगाणविरुद्ध कोहलीने आपले पहिले शतक झळकविले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याचे तब्बल तीन वर्षांनंतरचे हे पहिले शतक आहे. या सामन्यात कोहलीने इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर षटकार खेचून आपले हे शतक 86 चेंडूत झळकविले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी आखूड टप्प्यावर गोलंदाजी केली. पण कोहली आणि इशान किशन यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठविला. डावातील 36 व्या षटकात इशान किशन तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर इबादत हुसेनने श्रेयस अय्यरला 3 धावांवर तर के. एल. राहुलला 8 धावांवर बाद केले. कोहली पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. शकीब अल हसनने त्याला झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. सुंदरने 27 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37, अक्षर पटेलने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. शार्दुल ठाकुर 3 धावांवर बाद झाला. भारताच्या डावामध्ये 14 षटकार आणि 41 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमद, इबादत हुसेन आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 2 तर मुस्तफिजूर रहमान व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 34 षटकात 182 धावात आटोपला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. अनुभवी शकीब अल हसनने 4 चौकारांसह 43, कर्णधार लिटॉन दासने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29, यासीर अलीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, मेहमुदुल्लाने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, तस्कीन अहमदने 2 षटकारांसह नाबाद 17, मुस्तफिजूर रहमानने 2 चौकारांसह 13, अनामुल हकने 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. या मालिकेतील गेल्या दोन सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा मेहदी हसन मिराज ठाकुरच्या गोलंदाजीवर केवळ 3 धावा जमवित झेलबाद झाला. बांगलादेशच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे शार्दुल ठाकुरने 30 धावात 3 तर अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 तसेच मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकात 8 बाद 409 (इशान किशन 210, विराट कोहली 113, वॉशिंग्टन सुंदर 37, अक्षर पटेल 20, इबादत हुसेन 2-80, शकीब अल हसन 2-68, तस्कीन अहमद 2-89, मुस्तफिजूर रहमान 1-66, मेहदी हसन मिराज 1-76), बांगलादेश 34 षटकात सर्वबाद 182 (शकीब अल हसन 43, लिटॉन दास 29, यासीर अली 25, मेहमुदुल्ला 20, तस्कीन अहमद नाबाद 17, मुस्तफिजूर रहमान 13, ठाकुर 3-30, अक्षर पटेल 2-22, उमरान मलिक 2-43, मोहम्मद सिराज 1-27, वॉशिंग्टन सुंदर 1-2).
वनडेत वेगवान द्वितशके नोंदवणारे फलंदाज
फलंदाज चेंडू प्रतिस्पर्धी
इशान किशन 126 बांगलादेश
ख्रिस गेल, विंडीज 138 झिम्बाब्वे
सेहवाग, भारत 140 विंडीज
तेंडुलकर, भारत 147 द.आफ्रिका
फखर झमान, पाक 148 झिम्बाब्वे
रोहित शर्मा, भारत 151 लंका
गुप्टिल, न्यूझीलंड 153 विंडीज
रोहित शर्मा 156 ऑस्ट्रेलिया.









