उमेश यादव, जयदेव उनादकटही दुखापग्रस्त असल्याची बीसीसीआयकडून माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील महिन्यात 7 जूनपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमध्ये लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे पण आयपीएलचा हंगाम सुरु असतानाच भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल दुखापग्रस्त झाला. आरसीबी आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना राहुलला गंभीर दुखापत झाली अन् तो आयपीएलमधून बाहेर पडला. विशेष म्हणजे राहुल दुखापतीमुळं आगामी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकणार आहे. यामुळे राहुलच्या जागी डावखुरा फलंदाज ईशान किशनची भारतीय संघात निवड करण्यात आली असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. याशिवाय बीसीसीआयने राखीव असलेल्या खेळाडूंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये पुढे सांगितले की, राखीव खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव असणार आहेत.
उनादकट, उमेश यादवही दुखापतग्रस्त
केएल राहुल याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. राहुलची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर एनसीएमध्ये फिटनेस चाचणी देईल. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून राहुल बाहेर मुकणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याशिवाय उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या दुखापतीबाबतही माहिती देण्यात आली आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. जयदेव सध्या बेंगळूरमधील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. जयदेव उनादकटच्या फिटनेस चाचणीनंतर सहभागाबद्दल निर्णय घेण्यात येईल. याशिवाय उमेश यादवलाही दुखापत झाली आहे. 26 एप्रिल रोजी कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान उमेश यादव दुखापतग्रस्त झाला होता. केकेआर मेडिकल टिम उमेश यादवच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयचेही मेडिकल पथक उमेश यादवच्या संपर्कात आहे. उमेश यादवच्या फिटनेसवर बीसीसीआयचे लक्ष आहे.









