वृत्तसंस्था / निंग्बो (चीन)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल-पिस्तुल आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताची ऑलिम्पियन नेमबाज इशा सिंगने सुवर्णपदक पटकाविले. इशा सिंगच्या सुवर्णपदकामुळे भारताचा या स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ समाप्त झाला.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत 20 वर्षीय इशा सिंगने अंतिम फेरीत चीनच्या याओ क्वियानझूनचा 0.1 गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात चीनच्या क्वियानझूनने रौप्य पदक तर विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाची ओह येजीनने कांस्यपदक मिळविले. इशा सिंगचे विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
या स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारत आता पाचव्या स्थानावर आहे. इतर तीन देशांनी या स्पर्धेत प्रत्येकी 1 सुवर्णपदक तर यजमान चीनने आघाडीचे स्थान मिळविताना 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली आहे. इशा सिंगने अंतिम फेरीत 242.6 गुण नोंदवित सुवर्णपदक पटकाविले तर चीनच्या क्वियानझूनने 242.5 गुणांसह रौप्य पदक घेतले. या स्पर्धेत भारताच्या पुरूष नेमबाजांकडून साफ निराशा झाली. पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या भावेश शेखावतला 22 व्या स्थानावर तर प्रदीप सिंग शेखावतला 23 व्या आणि मनदीप सिंगला 39 व्या स्थानावर समाधान मानावे लागले









