कोल्हापूर / दीपक जाधव :
जागतिक किडनी दिनानिमित्त किडनीच्या आरोग्याशी संबंधित गंभीर आजार दुर करण्यासाठी दरवर्षी एक विशिष्ट थीम घेऊन जनजागृती करण्यात येते. यावर्षीची थीम ही तुमची किडनी ठीक आहे का? लवकर शोधा, किडनीच्या आरोग्याचे रक्षण करा, ही असुन किडनीचे आजार रोखण्यासाठी लवकरात लवकर तपासणी करून उपचार करावेत हा उद्देश आहे.
पूर्वी किडनीचे विकार हे प्रौढामध्ये असायचे मात्र आता हा आजार जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणालाही होऊ शकतो. सध्या उपचाराअभावी 95 टक्के रुग्णांवर मृत्यू ओढवला जात असल्याचे जागतिक पाहणीत निष्पन्न झाले आहे. किडनीचा आजार होऊ नये यासाठी रुग्णाने रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेऊन निरोगी आयुष्य जगले पाहिजे. रोजचा व्यायाम, जास्तीत जास्त पाणी पिणे व वेळच्यावेळी आवश्यक त्या तपासण्या तज्ञ डॉक्टराकडुन करून घेउन सल्ला घेणे.
- यामुळे होतो किडनीचा आजार
वेदनाशामक औषधाचं प्रमाणाबाहेर सेवन, गांजा, अल्कोहोल, कावीळ, स्वादुपिंड ग्रंथीचे विकार, मूतखडा, जंग फुड खाणे, प्रोस्टेड ग्रंथींची वाढ, काही किडनीचे ग्लोमरुलसचे विकार, जंतू संसर्ग पूर्ण शरीरात पसरणे, बऱ्याच वेळा या आजाराची तीव्रता कमी समजली जाते. त्यातच काही तपासण्याकरिता उशीर देखील होतो.
- अशी आहेत लक्षणे
मळमळ, उलट्या, भूक कमी लागणे, पोटात दुखणे. रात्रीचे वारंवार लघवीला होणे. लघवी करताना त्रास होणे तसेच लघवी लाल होणे. रक्तदाब वाढणे, थकवा व श्वसनाचा त्रास होणे. चेहरा, हात–पायावर सूज येणे. लघवीचे प्रमाण कमी जास्त होणे, अंगाला फोड येणे, त्वचा कोरडी पडणे, खाज येणे यासारखी लक्षणे किडनीच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसतात.
सध्या किडनीचा आजार हा जन्मापासुन मृत्यूपर्यंत कोणालाही होऊ शकतो. या आजाराची जनजागृती होणे गरजेच असून यासाठी शाळा महाविद्यालयात तरुण पिढी ला या आजाराची माहीती देणे गरजेच आहे.
डॉ.दादासो कोळी. नेप्रॉलॉजिस्ट,सेवा रुग्णालय








