ट्रम्प यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ, भारतीय जनता पक्षाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेच्या ‘युएसएड’कडून भारतातील काही शक्तींना मिळालेला पैसा भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी आणि भारतात ‘अन्य कोणाचे’ सरकार आणण्यासाठी देण्यात आल्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी याच संदर्भात शुक्रवारी आणखी आरोप केले असून ही रक्कम म्हणजे ‘किकबॅक घोटाळा’ असल्याचे प्रतिपादन केले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या प्रशासनकाळात भारतासह अनेक देशांमधील काही शक्तींना कोट्यावधी डॉलर्स पुरविण्यात आले होते. भारतातील काही जणांना 2 कोटी 10 लाख डॉलर्स किंवा जवळपास 170 कोटी रुपयांची रक्कम येथील मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून देण्यात आली होती. मात्र, भारत सरकारने अशी कोणतीही रक्कम मागितलेली किंवा स्वीकारलेली नसून, केंद्रीय निवडणूक आयोगाचाही या रकमेशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आले होते. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणाला मिळाली, हा प्रश्न असून भारतीय जनता पक्षाने सखोल चौकशीची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी केलेल्या नव्या आरोपांमुळे हे गूढ अधिकच वाढले आहे.
भारतातल्या मतदानाशी संबंध काय ?
भारतात मतदान वाढावे यासाठी अमेरिकेने आपल्या करदात्यांचा पैसा उपयोगात आणण्याचे काय कारण आहे, असा प्रश्न ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाला विचारला आहे. हा नेमका काय गोंधळ चालला होता, काहीही कळायला मार्ग नाही. तथापि, ही रक्कम भारतातील निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी, तसेच भारतातील केंद्र सरकार पाडविण्यासाठी उपयोगात आणली असावी, अशीही शक्यता ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केलेली असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
ही रक्कम बांगलादेशसाठी ?
ट्रम्प यांनी गेल्या तीन दिवसांपासून या रकमेचा मुद्दा लावून धरला आहे. गुरुवारी अमेरिकेतून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून या 2 कोटी 10 लाख डॉलर्सच्या रकमेचा भारताशी संबंध नाही. ही रक्कम बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ घडविण्यासाठी देण्यात आली होती, असे प्रतिपादन या अहवालात करण्यात आले आहे. तथापि, हा अहवाल धादांत खोटा असून केवळ या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी आणि भारतातील ‘डीप स्टेट’ किंवा केंद्र सरकारविरोधातील गुप्त शक्तींचे कारस्थान उघडे पडू नये, म्हणून असा अहवाल प्रसिद्ध करुन सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा अर्थाचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. चौकशीची मागणी होत आहे.
बांगलादेशला रक्कम का?
ट्रम्प यांनी शुक्रवारी केलेल्या आरोपांमध्ये बांगला देशमधील काही शक्तींना अमेरिकेकडून देण्यात आलेल्या जवळपास 3 कोटी डॉलर्सच्या रकमेचाही उल्लेख करण्यात आला आहे. ही रक्कम बांगलादेशातील ‘पॉलिटिकल लँडस्केप’ (राजकीय वातावरण) सुधारण्यासाठी देण्यात आल्याचे दिसत आहे. पॉलिटिकल लँडस्केप’ चा नेमका अर्थ काय आहे, हे समजण्याच्या पलिकडले आहे, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या गव्हनर्सच्या बैठकीत केली आहे.
अन्य रकमांचाही उल्लेख
अमेरिकेच्या ‘युएसएड’कडून नेपाळमधील जैवबहुविधतेसाठी अमेरिकेकडून देण्यात आलेले जवळपास 2 कोटी डॉलर्स, आशियातील ‘आऊटकम्स’ सुधारण्यासाठी दिले गेलेले 4.7 कोटी डॉलर्स, ‘फिस्कल फेडरॅलिझम’ किंवा आर्थिक संघराज्य संकल्पनेसाठी दिलेले 2 कोटी डॉलर्स यांचाही उल्लेख आपल्या भाषणात ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण ‘युएसएड’ कार्यक्रमच संशयात सापडला आहे.
हे डीपस्टेटचे कारस्थान
ट्रम्प यांच्या आरोपांमुळे भारतातील डीपस्टेटचे कारस्थान उघडे पडले आहे. भारतातील काही शक्तींसाठी नेमून दिलेली 2.10 कोटी डॉलर्सची रक्कम भारतातील डीपस्टेट किंवा केंद्र सरकारविरोधातली गुप्त कारस्थानी शक्ती भक्कम करण्यासाठी उपयोगात आणली गेल्याची शक्यता आहे. तसेच भारतातील हे डीपस्टेटचे कारस्थान बाहेर येऊ नये, म्हणून काही ‘वजनदार’ व्यक्तींना वश करुन घेण्यासाठीही या रकमेचा उपयोग केला गेला असू शकतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला.
मनमोहन सिंगांच्या काळात प्रचंड रक्कम
‘युएसएड’च्या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतासाठी मनमोहन सिंग यांच्या काळात प्रचंड रक्कम देण्यात येत होती, असाही गौप्यस्फोट अमेरिकेतूनच करण्यात आला आहे. 2004 ते 2014 या काळातील काँग्रेसप्रणित सरकारच्या काळात ‘युएसएड’कडून भारताला 204 दशलक्ष किंवा 20.4 कोटी डॉलर्सची रक्कम देण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मात्र ही रक्कम अवघी 15 लाख डॉलर्स होती, अशीही माहिती आता बाहेर आल्याने हे सर्व प्रकरण नेमके काय आहे आणि ‘युएसएड’कडून ही रक्कम नेमकी कोणाला देण्यात येत होती, हे प्रश्न अतिशय प्रकर्षाने पुढे आले आहेत. त्यामुळे या साऱ्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
परराष्ट्र विभागाकडून तीव्र प्रतिक्रिया
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘युएसएड’ने वाटलेल्या कोट्यावधी डॉलर्ससंबंधात जो गौप्यस्फोट केला आहे, तो अतिशय गंभीर असून भारत सरकारचे विविध विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ते शुक्रवारी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. भारताच्या निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या पैशाच्या साहाय्याने ढवळाढवळ करणाऱ्या दुष्ट शक्तींचा बिमोड होण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करण्याचे काम हाती घेण्यात आले असून सर्वंकष चौकशी केली जाईल. सध्या केंद्र सरकार या विषयावर अधिकृत टिप्पणी करणार नाही. मात्र, सखोल तपास केला जाईल आणि वस्तुस्थिती मांडली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसने आरोप फेटाळले
पूर्वीच्या काँग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारने अमेरिकेकडून पैसा घेतला हा भारतीय जनता पक्षाचा आरोप खोटा आहे. हा केवळ पक्षपाती आरोप आहे. अण्णा हजारे यांनी काँग्रेसप्रणित सरकारच्या विरोधात केलेले आंदोलन अमेरिकेच्या पैशाच्या साहाय्याने होते. अमेरिकेच्या फोर्ड फाऊंडेशनकडून हजारे पैसा घेत होते, ही बाब सर्वांना माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने नाकाने कांदे सोलू नयेत, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी शुक्रवारी केली आहे.
ट्रम्प यांचे आरोप गंभीर
ड अमेरिकेच्या पैशाच्या साहाय्याने भारताच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप
ड केंद्र सरकारच्या सर्व मुख्य विभागांकडून तपासणीच्या कामाला प्रारंभ
ड ‘युएसएड’च्या पैशाने केंद्र सरकारविरोधात कृत्ये : भाजपचा आरोप
ड भारताच्या विदेश व्यवहार विभागाकडून ट्रम्प यांच्या आरोपांची दखल









