वेंगुर्ले (वार्ताहर)-
संस्थाचालक इर्शाद शेख यांचा सवाल
Is there perfect planning while implementing the new education policy?
येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणमंत्र्यांनी नविन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करुन दाखविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल या जबाबदार कोण? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शिक्षण संस्था चालक इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे.नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणार काय? आर्टस, कॉमर्स, सायन्सऐवजी नववीपासूनच संबंधित शाखांचे विषय निवडून ते बारावीपर्यंत घ्यायचे आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली नवी पुस्तके छापून पूर्ण होणार का?, दहावी बोर्डपरीक्षेऐवजी नववी ते बारावी दरवर्षी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा होऊन ते माक्र्स बारावीच्या अंतिम परीक्षेतही मिळवले जाणार आहेत. या नववी ते बारावी वर्गांना शिकवणारे शिक्षक कोण असणार आहेत? त्यांची नेमणूक नव्याने होणार की जुने शिक्षकच शिकवणार? त्यांची शैक्षणिक पात्रता नवीन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी योग्य असणार आहे का? किंवा नवीन शिक्षक भरती करायची असेल तर कधी करणार त्यांचा पगार स्केल इ. काय असणार आहे? नव्या पॅटर्नला अनुसरून त्यांचे प्रशिक्षण होणार आहे का? आणि ते कधी होणार आहे?
नववी ते बारावी पर्यंतचे विषय पारंपरिकच असणार आहेत की त्यात कालनिहाय काही नवे विषय (उदा. फलज्योतिष, गोमूत्रचिकित्सा इ.) अंतर्भूत होणार आहेत?, आता दहावीपर्यंत माध्यमिक व अकरावी बारावी उच्चमाध्यमिक असा पॅटर्न संपुष्टात येणार असल्याने आधीच्या पॅटर्नप्रमाणे ज्या माध्यमिक शाळा फक्त दहावीपर्यंतच आहेत व जे उच्च माध्यमिकचे वर्ग सिनियर कॉलेजला जोडलेले आहेत, तिथे नवा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे?, पूर्वमाध्यमिक (पाचवी ते आठवी) व माध्यमिक (नववी ते बारावी) वर्ग एकाच इमारतीत भरणार असतील तर वेगवेगळे विषय कसे शिकवणार वेळेचे, वर्गखोल्यांचे नियोजन कसे राहील? सर्व शाळा या दृष्टीने सक्षम आहेत का?, माध्यमिक शाळा ज्या सध्या दहावी पर्यंत आहेत तेथेच पुढील अकरावी बारावी सुरू झाल्यास पदवी महाविद्यालयांना जोडून असणारी आताची ज्युनियर कॉलेजला अकरावी बारावीसाठी विद्यार्थी कुठून मिळणार आणि तेथे काम करणा-या शिक्षकांचे काय होणार? या सर्व वर्गांसाठी विद्यार्थी संख्येचा निकष काय असणार आहे?, विद्यार्थ, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांना या संदर्भात विश्वासात घेतले गेले आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्र्यांनी द्यावीत असे इर्शाद शेख यांनी स्पष्ट केले आहे.









