आप च्या प्रतिमा कुतिन्हो यांचा सवाल
पणजी : मुख्य जलस्रोत अभियंता प्रमोद बदामी यांना निवृत्तीनंतर तब्बल चार वेळा सेवावाढ देण्यावरून आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीकीचे झोड उठवली असून जलस्रोत खात्यात अभियंत्यांचा दुष्काळ आहे का? असा सवाल उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी संदेश तेलेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सदर बदामी यांना मुख्यमंत्री वारंवार सेवावाढ देत आहेत यावरून ते त्यांच्या एवढे प्रेमात का पडले आहेत, त्यामागील गुपित मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान कुतिन्हो यांनी दिले आहे. अन्यथा या दोन्ही ’प्रमोद’ दरम्यान संगनमत असल्याचा समज समाजात पसरेल, असे त्या म्हणाल्या. बदामी हे मूळ कर्नाटक राज्यातील असल्यामुळे त्यांना गोव्यापेक्षा स्वत:च्या राज्याबद्दल जास्त आस्था असणे साहजिक आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही आतापर्यंत अनेकदा ते बिगरगोमंतकीय असल्याचे आरोप झालेले आहेत. हे दावे आणि आरोप खोटे ठरवायचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी म्हादई संबंधी स्वत:ची खरी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बदामी सारख्या निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल चार वेळा सेवावाढ देणे म्हणजे या खात्यातील अन्य अधिकाऱ्यांवर स्वत: मुख्यमंत्र्यांकडूनच अन्याय केल्यासारखे होते. राज्यात बदामी यांच्या तोडीच्या अधिकाऱ्यांचा दुष्काळ आहे का? असा सवाल कुतिन्हो यांनी उपस्थित केला. एका बाजूने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे आपण कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवणारच अशी दर्पोक्ती करतात आणि गोव्याचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात जाऊन भाजपचा प्रचार करतात यावरून मुख्यमंत्र्यांना गोव्याबद्दल किती स्वाभिमान आहे त्याची प्रचिती येते, असे कुतिन्हो म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी खरे तर कर्नाटकात प्रचारसभेत केलेल्या भाषणातून कर्नाटकाचा निषेध करायला हवा होता, तरच त्यांचा स्वाभिमान दिसून आला असता, असे त्या म्हणाल्या. आपल्या अशाप्रकारच्या वागणुकीतून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जिला ते स्वत:ची आई म्हणून संबोधत होते त्या म्हादई आईच्या पाठितच खंजिर खुपसला आहे, अशी गंभीर टीकाही कुतिन्हो यांनी केली.









