मतदानाची टक्केवारी घसरली, की सत्ताधारी जिंकणार असे गृहितक मानले जाते. तसेच मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढले तर तो सत्ताधारी पक्षासाठी शुभसंकेत नसतो, असेही मानण्याची प्रथा होती. तथापि, हे गृहितक खरे नसल्याचे अनेक निवडणुकांवरुन दिसून आले आहे….
या गृहितकाचे कारण
? 1947 ते 1977 या काळात देशात लोकसभेच्या पाच निवडणुका झाला. या सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 50 ते 53 टक्के इतकी होती. पहिल्या 1952 च्या निवडणुकीत तर ती 45 टक्के इतकीच असल्याचे दिसते.
? या सर्व 30 वर्षांच्या काळात देशावर काँग्रेसचेच गारुड होते. त्यामुळे ‘काँग्रेसशिवाय येणार तरी कोण, ही भावना असल्याने मतदानामध्ये फारसा उत्साह लोकांना नसायचा. शहरी भागात तर मतदान 40 टक्क्यांपर्यंतच असायचे.
1977 ची ऐतिहासिक निवडणूक
1977 मध्ये प्रथमच काँग्रेसचा निर्णायक पराभव झाला. जनता पक्षाने प्रथमच प्रयत्नात पूर्ण बहुमत मिळविले. त्यावेळी मतांच्या टक्केवारीने प्रथम 60 टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता. एकंदरीत साधारण 64 टक्के मतदान झाले. शहरी मतदान प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढली. सत्तापरिवर्तन झाले. म्हणून मतदान वाढले की सत्तापरिवर्तन ही समजूत दृढ झाली.
? 1977 नंतर लोकसभेच्या चार सलग निवडणुकांमध्ये, अर्थात 1991 पर्यंत मतदानाची टक्केवारी पुन्हा 60 टक्क्यांच्या खाली घसरली होती. 1989 चा अपवाद वगळता अन्य निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. अनेक विधानसभा निवडणुकांमध्येही मतदान कमी झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल लागला होता. त्यामुळे ही भावना अधिकच दृढ झाली.
? तथापि, या समजुतीला खरा तडा गेला तो 2000 नंतरच्या निवडणुकांमध्ये. विशेषत: भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर ‘प्रो इन्कंबन्सी“ किंवा प्रस्थापितानुकूल“ भावना नव्याने मतदारांमध्ये दिसून येऊ लागली होती. 1999 मध्ये वाजपेयींचे सरकार 13 महिन्यांमध्ये गडगडल्यानंतर 1999 मध्येच मध्यावधी निवडणूक घ्यावी लागली होती. मतदान किंचित जास्त झाले होते.
? मतदान जास्त झाल्याने वाजपेयी सरकार पुन्हा येणार नाही, अशी अटकळ राजकीय विश्लेषकांनी बांधली होती. तथापि, पुन्हा वाजपेयी सरकारच निवडून आले. प्रस्थापितांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठीही लोक अधिक प्रमाणात मतदान करतात, हे सिद्ध झाले.
? मध्यप्रदेशमध्ये 2003 मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्यानंतर 2008 च्या विधानसभा निवडणुकीत टक्केवारी 4 टक्के वाढून ती 70 टक्क्यांपेक्षा जास्त झाली. तरीही सरकार पुन्हा निवडले गेले.
ड 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान दोन टक्के जास्त झाले होते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारलाच लोकांनी अधिक मोठा कौल दिला होता.
मतदान कमी झाले तर काय
ड मतदान कमी झाले तरी सत्ताधारी पक्ष पायउतार होतो, किंवा तोच सत्तेवर राहतो, या दोन्ही समजुती चुकीच्या ठरविणारे, अनेक परिणाम 2000 नंतर समोर आलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का आणि विशिष्ट पक्षांचा विजय यांचे काहीही समीकरण नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदान जास्त तर विरोधकांचा विजय आणि मतदान कमी तर सत्ताधाऱ्यांचा विजय या समजुतीला निदान नव्या काळात तरी फारसा अर्थ राहिलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे.
मतदान कमी किंवा जास्त का होते…
? हवामान हा कित्येकदा महत्वाचा घटक ठरतो. तापमान अल्हाददायक असेल तर मतदानाचा उत्साह अधिक असतो असे आढळले आहे. त्यामुळे मे महिन्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांपेक्षा डिसेंबरातील निवडणुकांमध्ये मतदान जास्त झाल्याचे अनेकदा दिसून येते. हवामानाचा परिणाम असा मतदानावर होत असतो.
? मतदाराचा ‘मूड हे कारण असू शकते. मतदारांमध्ये सामुहिक नाराजी असेल तर मतदान कमी होते. तसेच उमेदवारांसंबंधी अपेक्षा नसतील तर, किंवा स्थानिक प्रश्न सुटले नाहीत म्हणून, मतदान कमी होऊ शकते. तथापि, ते जास्त किंवा कमी झाले तरी, त्याचा थेट संबंध निवडणुकीच्या परिणामाशी जोडता येत नाही.









