पाण्याशी संपर्क झाल्यास लोखंड गंजते आणि त्याची झीज होऊन ते कमजोर होते, याची आपल्याला कल्पना आहे. तथापि, प्रचंड उष्णता असणारा पृथ्वीचा गाभाही गंजू शकतो, हे वृत्त आपल्यासाठी निश्चितच आश्चर्यकारक आहे. तथापि, ही वस्तुस्थिती असू शकते, असा इशारा भूगर्भ संशोधकांनी दिला आहे. पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल इत्यादींच्या मिश्रणाने बनलेला असून तेथे प्रचंड उष्णता असते. हा गाभा पृथ्वीच्या पृ÷भागापासून साधारणतः 2 हजार 900 ते 3 हजार किलोमीटर खोल आहे. तथापि, आर्द्रतेमुळे या गाभ्याला गंज चढू शकतो आणि तो कमजोर होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
‘ऍडव्हान्स अर्थ अँड स्पेस सायन्स’ या विज्ञान विषयाला वाहिलेल्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत पृथ्वीच्या गाभ्यासारखी परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर या गाभ्यामध्ये ओलसरपणा निर्माण केला. त्यानंतर गाभ्याच्या बाहय़ आवरणात गंज निर्माण झाल्याचे दिसून आले. अशीच स्थिती पृथ्वीच्या गाभ्यासंदर्भातही होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थात आताच ही स्थिती निर्माण झाली आहे, असे नव्हे. ती निर्माण होण्यासाठी कित्येक सहस्र वर्षांचा कालावधीही लागू शकेल. तसेच असे झाल्याने त्वरित पृथ्वीचा नाश होईल किंवा पृथ्वीची वरची आवरणे कमजोर होतील, असे नाही. मात्र, ही स्थिती ओढवू शकते हे लक्षात घेतले पाहिजे, असे संशोधक म्हणतात.









