बाटला हाऊस परिसरात एनआयएकडून छापा, अनेक कागदपत्रे जप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने दिल्लीतील बाटला हाऊस परिसरातून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाच्या (आयएसआयएस) एका दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहसीन अहमद असे सदर दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. या छाप्यात त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. रविवारी त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर एनआयएने सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायमूर्तींनी सध्या त्याला केवळ एका दिवसाची एनआयए कोठडी ठोठावली आहे.
मोहसीन हा अनेक दिवसांपासून आयएसआयएस मॉडय़ूलचा सक्रिय सदस्य होता. एनआयएच्या टीमने बाटला हाऊसमधील एका घरावर छापा टाकत मोहसीनला अटक केली आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांनी मोहसीनबद्दल माहिती दिली होती. त्या आधारे तपास यंत्रणेने ही कारवाई केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने अनेक विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने 25 जून रोजीच मोहसीनविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. आता त्याला अटक झाली असून स्वातंत्र्यदिनापूर्वी तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
सीरियातील आयएस कमांडर्सच्या संपर्कात
मोहसीन हा अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आयएसआयएस कमांडर्सच्या संपर्कात होता आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे त्यांना निधी पाठवत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मोहसीन अहमद भारतात आयएसआयएसला निधी पुरवायचा अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱयांनी दिली आहे. क्रिप्टोकरन्सी आणि हवालाद्वारे केलेल्या व्यवहारांना कोणी निधी दिला हे तपास यंत्रणा आता तपासत आहे. त्याचा हँडलर कोण आहे आणि तो कुठे बसला आहे? पुढे तो कुठे पैसे पुरवत होता? पैसे कोणाकडे पाठवले जात होते? याचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले. तथापि, सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव चौकशीत उघड झालेली सविस्तर माहिती तपास यंत्रणांनी जारी केलेली नाही.









