भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव चीनच्या दौऱ्यावर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री सध्या चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याशी सोमवारी व्यापक चर्चा केली आहे. त्यांच्यासह भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवालही आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी आहेत. भारत-चीन सीमा भागाचे विशेष प्रतिनिधीही आहेत.
मागच्या वर्षी रशियातील कझान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्याआधी गेली जवळपास 3 वर्षे लडाख सीमारेषेवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला संघर्ष मिटविण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी महत्वाचे निर्णय घेऊन सीमारेषेवरुन आापपल्या सेना माघारी घेण्यासंबंधी महत्वाचा करार करण्यात आला होता. तसेच या कराराचे त्वरित कार्यान्वयनही करण्यात आले होते. त्यामुळे एक सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात दोन्ही देशांना यश आले होते. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनंिपंग यांच्यात झालेल्या बैठकीमुळे वातावरणातला तणाव आणखी निवळला होता. आता भारताच्या विदेश सचिवांच्या चीन दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी कमी करण्यासाठीचे प्रयत्न अधिक गतीमान होताना दिसत आहेत.
वांग यी यांच्याकडून समाधान व्यक्त
विक्रम मिस्री यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक जवळचे करण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया पुढे नेण्यात चीनला स्वारस्य आहे, याचे संकेत त्यांनी दिले. संबंध सुधारण्यासाठी चीन उत्सुक आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांना संबंध सुधारण्याची एक महत्वाची संधी प्राप्त झाली आहे. ती दोन्ही देशांनी साधावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दक्षिण गोलार्धातील देशांचे अधिकार
दक्षिण गोलार्धातील देशांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे, असे चीनचेही धोरण आहे. आम्ही या संबंधात साहाय्यक ठरु शकतो. जागतिक सहकार्यासाठी आम्ही अनुकूल आहोत. भारत आणि चीन यांच्यातील जवळीकीचे संबंध आशिया आणि जगात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच भारत आणि चीन हे दोन्ही देश जगातील प्राचीन देशांपैकी आहेत. या पुरातन संस्कृती शांती, स्थिरता, विकास आणि समृद्धी यासाठी महत्वाचे योगदान करु शकतात, असे महत्वपूर्ण वक्तव्य वांग यी यांनी केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जागतिक अभ्यासकांनीही यासंबंधी सकारात्मक मत व्यक्त केले आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी चर्चा
रविवारी मिस्री यांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख नेते लियू जियानचाओ यांच्याशी चर्चा केली आहे. हा विभाग चीनच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारण करतो, अशी माहिती देण्यात आली. सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या वातावरणात भारत आणि चीन यांच्या सहकार्याला महत्व प्राप्त झाले असून दोन्ही देशांनी मतभेदांची दरी अरुंद करणे आवश्यक आहे. भारत आणि चीन हे शेजारी देश असल्याने त्यांच्यातील संघर्ष टाळणे आणि समतोल निर्माण करणे, ही महत्वाची बाब असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा
गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण ठरावांचे प्रभावी कार्यान्वयन करणे, ज्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली आहे, ती अधिक बळकट करणे, भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ बनविणे आणि दोन्ही देशांच्या विकासाला प्राधान्य, या प्रमुख मुद्द्यावर विक्रम मिस्री आणि वांग यी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चीनच्या नेत्यांशी चर्चा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.









