इस्रायल-इराण युद्धाच्या काळात तीन उत्तराधिकारी निवडले
वृत्तसंस्था/ तेहरान
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा जोर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचदरम्यान युद्धाच्या काळात तेहरानमधून एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आता बंकरमध्ये लपून युद्ध रणनीती बनवत आहेत. दुसरीकडे, त्यांनी लष्करी कमांडरच्या संभाव्य मृत्यूसाठी केवळ बॅकअप तयार केला नाही. तर त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून तीन वरिष्ठ धार्मिक नेत्यांची नावे देखील गुप्तपणे निश्चित केली आहेत.
इस्रायलने इराणवर अचानक आणि जलद हल्ल्यांनंतर राजधानी तेहरानमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. सरकारी सूत्रांनुसार, खामेनी आता कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक संभाषण टाळत आहेत. ते केवळ एका विश्वासू संदेशवाहकाद्वारे लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. आपले स्थान ट्रॅक करता येऊ नये यासाठी त्यांनी पूर्ण दक्षता घेतलेली दिसून येत आहे. इराणचे सर्वोच्च नेतृत्व सध्या स्वत:ला एका भयंकर युद्धाच्या केंद्रस्थानी असल्याचे मानत आहे.
पहिल्यांदाच इतकी तयारी आणि भीती
खामेनी यांनी जाहीरपणे त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी ही निवड अतिशय गुप्तपणे केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही केवळ एक रणनीती नाही तर त्या भीतीचे प्रतिबिंब देखील आहे. यापूर्वी 1980 च्या दशकात इराकशी झालेल्या युद्धादरम्यानही अशी परिस्थिती दिसून आली नव्हती. आताचे इस्रायलसोबतचे युद्ध भडकण्याची चिन्हे गृहीत धरून खामेनी यांनी मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येते.
इस्रायली हल्ला खूप धोकादायक
गेल्या शुक्रवारपासून इस्रायलने सुरू केलेले हल्ले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात विनाशकारी हल्ले आहेत. हे हल्ले इराण-इराक युद्धापेक्षाही अधिक प्राणघातक ठरत आहेत. अवघ्या काही दिवसात तेहरानला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे.
इराणचा इस्रायलवर प्रतिहल्ला
इराण या धक्क्यातून सावरत दररोज प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ले करत आहे. वृत्तानुसार, इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायली रुग्णालये, तेल शुद्धीकरण कारखाने, धार्मिक स्थळे आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. हा संघर्ष आता थेट सामान्य लोकांच्या जीवनावर पोहोचल्यामुळे संपूर्ण प्रदेशातील मानवतावादी संकट आणखी गडद होत आहे. इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागली, परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. उत्तर इस्रायलमध्ये एक इराणी ड्रोन एका दुमजली इमारतीवर पडले. परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे इस्रायलच्या डेव्हिड अॅडोम बचाव सेवेने शनिवारी सांगितले.
इस्फहान अणुसंशोधन केंद्र उद्ध्वस्त
इस्रायलने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर इस्फहान अणुसंशोधन केंद्रावर दुसऱ्यांदा हल्ला केला. या लक्ष्यित हल्ल्यात तीन वरिष्ठ इराणी कमांडर मारले गेले. दोन्ही देशांमधील युद्ध दुसऱ्या आठवड्यात दाखल झाले आहे. शनिवारी सकाळी इस्फहानमधील एका डोंगराजवळील भागातून धूर निघताना दिसला. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याच्या मते यात दोन सेंट्रीफ्यूज उत्पादन स्थळे लक्ष्य होती. इस्फहानमधील इराणच्या अणुकार्यक्रमाचा नाश करण्याच्या इस्रायलच्या ध्येयाचा भाग म्हणून 24 तासांतील हा दुसरा हल्ला होता.









