इस्त्रायल हमास युद्ध खरोखरच पेटेल काय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेला शांततेचा प्रस्ताव हमास मान्य करेल काय असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत, तिकडे इस्त्रायल गाझापट्टीवर आपले हल्ले सातत्याने तीव्र करत आहे आणि लवकरच गाझापट्टीवर अंतिम विजय संपादन करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेले शांतता प्रस्तावाचे जाळे मोठे अद्भुत आहे. एका अर्थाने त्यांना मध्यपूर्वेत शांतता आणावयाची आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांना हमासला अखेरची संधी द्यावयाची आहे.
प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि तीन चार दिवसात जर काही प्रतिसाद दिला नाही तर त्यांचा दुर्दैवी शेवट होईल असा इशाराही अध्यक्ष महोदयांनी दिला आहे. त्यावरून आता शस्त्रs खाली टाका, शांततेसाठी तयार व्हा, नाहीतर अंतिम पराभवाला सामोरे जा, असाच या प्रस्तावाचा अर्थ आहे. परंतु हमासची आजवरची वाटचाल पाहता ते सहजपणे प्रतिसाद देतील, शस्त्रs खाली टाकतील असे वाटत नाही, तथापि या शांतता प्रस्तावाचे महत्त्व नाकारता येत नाही.
हमास वठणीवर येणार
डोनाल्ड ट्रम्प यांचे शांतता धोरण गोड बोला पण पाठीशी मोठा दंडूका ठेवा असे आहे. त्यांनी हमासला शांततेचा प्रस्ताव दाखविला आहे. त्याबरोबरच गोड बोलत त्यांनी दंडुक्याचा चमत्कारही दाखवला. हमासला वठणीवर आणण्याचा हा एक शक्ती प्रयोग आहे. त्याला तेथील नेते किती व कसा प्रतिसाद देतात, हे पहावयाचे आहे. अहमगंडाने पछाडलेले हमासचे नेते या प्रस्तावाला किती प्रतिसाद देतात ते पहावयाचे आहे.
जर हमासने प्रतिसाद नाकारला तर तो खुप दुर्दैवी शेवट असेल असा इशारा ट्रम्प महोदयांनी दिला आहे. याचे दोन अर्थ होतात, पहिला म्हणजे इस्रायलच्या संभाव्य कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि दुसरे म्हणजे जर हमासनी प्रस्ताव ठोकरला तर त्याला युक्तीने नव्हे तर शक्तीने सरळ करण्याची योजना तयार आहे.
ट्रम्प यांच्या प्रस्तुत गाझा प्लॅनमध्ये तत्काळ युद्ध थांबविणे, पोलिसांना परत आणणे, त्यांची मुक्तता करणे, गाझा पट्टीच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय शांतता मंडळ स्थापन करण्याच्या योजनेचा त्यात समावेश आहे. कतार परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मोठी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते हमास प्रस्तावावर जबाबदारपणे अभ्यास करत आहे आणि अशा अभ्यासानंतर हमास त्यांना प्रतिसाद देण्यासाठी मार्ग शोधू शकते. याचा अर्थ असा की तीन-चार दिवस देऊन हमासला खेळवत ठेवण्याची ट्रम्प यांची योजना आहे. शिकार टप्प्यात आली आहे काही काळ खेळवल्यानंतर मग बोका हा उंदीर फस्त करेल असा त्यामागील डावपेच दिसतो.
हमासचा सावध पवित्रा
इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना हमासला नियंत्रित करावयाचे आहे. अमेरिकेचे वर्चस्व या दहशतवादी गटावर प्रस्थापित करावयाचे आहे तर दुसरीकडे हमास सावध पवित्रा घेत आहे आणि जपून पावले टाकत आहे. आपण प्रस्तावाचा सखोल अभ्यास करतो म्हणजे एक प्रकारचे ढोंग आहे. तीन चार दिवसानंतर हमासने जर माघार घेतली तर त्यामुळे त्यांना थोडी उसंत मिळेल. आता इस्त्रायलच्या सातत्यपूर्ण हल्ल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे व त्यांना विचार करण्यास फुरसत मिळत नाही. युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य करून हमासला अशाप्रकारे थोडासा ब्रीदिंग पिरेड मिळू शकेल. हमासमध्ये याबाबत दोन गट आहेत. आज एकाला वाटते की सरळ प्रस्ताव मान्य करून थोडी शांतता स्वीकारावी, दुसऱ्या गटाला उगाच शांततेच्या गोष्टी करणे योग्य वाटत नाही. आता तवा गरम आहे लढाई चालू आहे तर आपण शरणागती पत्करणे म्हणजे त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे जमेल तेवढे लढा असा पवित्रा घेणारा दुसरा गट आहे. यापैकी कोणता गट पुढाकार घेतो, कोणाचे पारडे जड आहे त्यावरच हमासच्या हालचाली ठरतील.
जबरदस्त आत्मविश्वास
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानेहू यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत जाऊन भाषण केले तेव्हा अनेक सदस्य राष्ट्रांनी सभा त्याग केला. असे असले तरी बेंजामिन महोदयांचा आत्मविश्वास जबरदस्त असल्याचे दिसून येते. आपण हरण्यासाठी लढत नाही. ही त्यांची आक्रमक भूमिका आरंभापासून आजपर्यंत कायम आहे. काही अटी पूर्ण झाल्यानंतर पॅलेस्टाईन स्वयं निर्णय आणि इस्त्रायल सर्व दबावांना झुगारून देऊन आत्मविश्वासाने यथायोग्य भूमिका घेत असतो. आणि आताही तो अशीच ठाम भूमिका घेईल, असा नेत्यानेहूंचा विश्वास आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे इस्रायल हमासला जबरदस्त विरोध करणार आहे, असे त्यांना वाटते.
नवीन अडचणी कोणत्या
इस्रायल हमास यांच्यातील तणाव युद्धजन्य परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काही ठाम प्रस्ताव घेऊन ट्रम्प उभे आहेत. तथापि या शांतता बोलणीमध्ये खरोखर काही चांगले घडावयाचे असेल तर या नव्या मध्यस्थांची समर्थ भूमिका तसेच विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचे आश्वासक मृगजळ आणि सर्व अरब राष्ट्रांचा विश्वास मिळविण्यात अमेरिकेला आलेले यश, यामुळे आता हमासचे तत्काळ किंवा लगेचच पुनरुज्जीवन होईल, असे वाटत नाही. खरे आव्हान आहे ते पॅलेस्टाईनच्या पुनर्वसनाचे, ट्रम्प महोदय तर या भागात मोठा प्रासाद उभा करू इच्छितात. तो प्रासाद कधी होईल, केव्हा होईल हे आज सांगता येत नाही. परंतु तूर्त तरी जर हा शांतता प्रस्ताव स्वीकारला गेला तर मात्र चित्र झपाट्याने बदलू शकते. नजीकच्या भविष्यकाळात या शांती बोलणीची योजना लक्षात घेता असे दिसते की या योजनेमध्ये ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीचे आणि डावपेचाचे चांगल्यापैकी प्रतिबिंब उमटले आहे. शांतता निर्माण झाली पाहिजे पण त्यासाठी आपण हमासला शरण जात आहोत अशी भावना निर्माण होता कामा नये, असे अध्यक्षांना वाटते ते खरेच आहे. भविष्यकाळात हमासला वठणीवर आणताना नवी भूमिका घेतली पाहिजे, आणि ती भूमिका सातत्याने टिकवून ठेवली पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल हमास समस्येवर वीस कलमी प्रस्ताव दिला आहे तो व्हाईट हाऊसच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,
कुटनीती आणि नवे पाऊल
डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटनितिक पाऊल मध्य पूर्वेत अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठल्याही संकटाचा सामना करताना एका बाजूला दीर्घकालीन दृष्टीने विचारविनिमय करण्याची गरज आहे. अमेरिका कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुत्सद्देगिरीचा पराभव होत आहे, हे जगासमोर येऊ देणार नाही. त्यामुळे आता ट्रम्प यांना हा प्रश्न सोडवायचा आहे व त्याचे फलितही स्वत:कडे ओढावयाचे आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव कसा, किती प्रकारे मांडला आहे ते समजून घेतले पाहिजे.
शांती प्रस्तावाचे महत्त्व
अमेरिकेने हमासकडे दिलेल्या शांतता प्रस्तावाचे अनेक विविध पैलू आहेत. त्यामध्ये एक दोन नव्हे तर 50 घटकांचा समावेश आहे, असा हा अद्भुत शांतता प्रस्ताव म्हणजे हमासला दूरदृष्टीने सुप्त खड्ड्यात टाकावयाचे आहे. या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेने दिलेला प्रस्ताव म्हणजे हा मोठा मासा पकडण्यासाठी टाकलेले ते एक जाळे आहे. आता अनुपस्थित राहून आक्रमक हल्ला करून विजय मिळविणे कठीण आहे. त्यामुळे भविष्यकाळात हमासचा संपूर्ण बंदोबस्त करणे हा ट्रम्प यांच्या योजनेचा कणा आहे. या प्रकारच्या राजकीय प्रस्तावाचे स्वरूप शक्ती आणि युक्ती या दोहोंच्या संगमावर अवलंबून असते, हे लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांच्या जाळ्यात हा मासा कसा लागतो का ते पहावयाचे आहे. हे युद्ध थांबविले तर ट्रम्प यांचे जगातील महत्त्व वाढेल असे वाटते. भविष्यात युद्धाला पूर्णविराम मिळावा हीच सर्वांची अपेक्षा आहे पण हमासची तिरपी चाल पाहता ते शक्य होईल का हाच खरा प्रश्न आहे?
-प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर








