सातारा :
कोकणात गणपती निमित्ताने बसेस पाठवण्यात आल्याने ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द केल्या जातील व काही फेऱ्या उशिरा धावतील, अशी सूचना एसटी आगारात लावण्यात आली आहे. त्याप्रमाणे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील ११ आगारातील एसटीचे व्यवस्थापन कोलमडले असून संतप्त प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फक्त कोकणातच गणपती आहेत काय?, सातारा जिल्ह्यात बाप्पा नाहीत काय?, प्रवाशांची गैरसोय थांबवा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, प्रवाशी आणि एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत खटके उडत आहेत. वादविवाद होत असून अनेक प्रवाशांना गावची मुक्कामी बस रद्द केल्याने सातारा एसटी स्टॅण्डवर मुक्काम करावा लागला.
सातारा जिल्ह्यातील सुमारे २६५ एसटी बसेस या कोकणात गणपतीच्या सेवेकरता पाठवल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ११ आगाराचे एसटीचे व्यवस्थापन कोलमडले आहे. अनेक गावातील मुक्कामी फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल, नोकरीनिमित्ताने येणाऱ्या नोकरदारांचे, रुग्णांचे, सणाला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा आगारातूनच नव्हे तर सर्वच ११ आगारात ही परिस्थिती आहे. त्यात विभागीय नियंत्रक ही पोस्ट सध्या व्हेकंट आहे. त्यामुळे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांना सक्षमपणे निर्णय घेता येईना. प्रवाशांचे हाल काही थांबेनात. ही गैरसोय २२ पासून सुरु झाली असून ग्रामीण भागात जाणारी एसटी बंदच झाली आहे. त्यामुळे वडापला दिवस आले आहेत. विशेष म्हणजे कोकणात एसटी बसेस घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत. सातारा आगारात अनेक मुक्कामी फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना स्टॅण्डमध्ये मुक्काम करावा लागला आहे. दरम्यान, एसटीच्या किती फेऱ्या रद्द झाल्या. सातारा विभागाला किती तोटा झाला याची माहिती विचारली असता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यासही टाळाटाळ झाली.








