ऊन-पावसाचा खेळ : शेतातील रोपलागवडीसाठी पुन्हा मोठ्या पावसाची गरज
वार्ताहर/किणये
तालुक्यात पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस कधी मोठ्याप्रमाणात तर कधी पावसाचा पत्ताच नसून कडक ऊन पडत आहे. कधी कधी पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शेतशिवारातील पाणी कमी झाले आहे. यामुळे भातरोप लागवड करताना व पॉवर ट्रिलर व बैलजोडीच्या साह्याने चिखल करताना अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या या उघडीपीमुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. शिवारातील पाणी कमी झाले आहे. आता भातरोप लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसोबत उभा ठाकला आहे. तालुक्यात गेल्या 20 ते 22 दिवसांपासून भातरोप लागवडीला सुरुवात करण्यात आली होती. भातरोप लागवडीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र याच कालावधीत पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शेत शिवारातील पाणी कमी झाले आहे.
पॉवर ट्रिलरच्या साह्याने मशागत
भातरोप लागवड करण्यासाठी प्रारंभी शेतकरी पॉवर ट्रिलरच्या साह्याने मशागत करतात. ही मशागत करताना शिवारात पाणी असणे गरजेचे आहे. त्यानंतर बैलजोडीच्या साह्याने मशागत करण्यात येते. ही मशागत करताना व भातरोप लागवड करताना शिवारात पाणी असणे आवश्यक आहे. शिवारातील पाणी कमी झाल्यामुळे भातरोप लागवडीची कामे ठप्प झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकरी शेतशिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा आधार घेऊन शिवारात पाणी देत आहेत. यावर्षी गेल्या महिन्याभरापूर्वी तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणी झाले. नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. तसेच शेतशिवारात पाणी झाले. त्यामुळे शिवारातील कामांना जोर आला. मात्र अजूनही भरपूर पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत घट
मागील चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नदी-नाल्याच्या पाणी पातळीत घट झाली आहे. तसेच शिवारातील पाणी कमी झाले आहे. याचा फटका भोतरोप लागवडीबरोबरच अन्य पिकांनाही बसणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्याप्रमाणात रताळी लागवड करण्यात आली आहे. या रताळी लागवडीच्या वेलीच्या वाढीसाठीही पावसाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केलेली आहे. त्यामध्ये कोळपणी करण्यात आली असून भांगलणीची कामे सुरू आहेत. या भाताच्या पिकामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. पावसाने अशीच उघडीप दिल्यास भातपिकावर मोठा परिणाम होणार आहे. भात रोप लागवडीसाठी तसेच अन्य पिकांच्या वाढीसाठी व उन्हाळ्dयात पाणी समस्या निर्माण न होण्यासाठी नदी-नाल्यांचे पाणी कमी न होण्यासाठी अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे आता मुसळधार पावसाची गरज असून अद्याप शेतकऱ्यांचे लक्ष मोठ्या पावसाकडे आहे.
कूपनलिका – विहिरीचे पाणी देऊन भात रोप लागवड
सध्या मात्र भातरोप लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शिवारातील पाणी कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शिवारात कूपनलिका व विहिरी आहेत ते शेतकरी धडपड करून कूपनलिका व विहिरीचे पाणी देऊन भात रोप लागवड करताना दिसत आहेत. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतशिवारात विहिरी व कूपनलिका नाहीत अशा शेतकऱ्यांची मात्र भातरोप लागवडीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.









