फिडर पिलर बॉक्सच्या दारांची होतेय चोरी
बेळगाव : हेस्कॉमकडून शहरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या. त्यावेळी वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी फिडर पिलर बॉक्स बसविण्यात आले. परंतु शहरातील बऱ्याचशा फ्यूज पेट्या व बॉक्सची दारे गायब झाली असून, त्या धोकादायक ठरत आहेत. लहान मुलांनी चुकुनही त्याला हात लावल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्यामुळे धोकादायक फ्यूज पेट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरातील वीजव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी हेस्कॉमकडून भूमिगत वीजवाहिन्यांची योजना राबविण्यात आली. तत्कालीन वीजमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या योजनेसाठी मेहनत घेतली होती. अंदाजे 350 कोटी रुपये खर्च करून उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत घालण्यात आल्या. यामुळे वीजवाहिन्यांचा धक्का पोहोचून होणारे अपघात कमी झाले. तसेच विद्युतपुरवठा ठप्प होण्याचे प्रमाणही कमी करण्यात हेस्कॉमला यश आले. भूमिगत वीजवाहिन्यांमधील विद्युतपुरवठा नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी फिडर पिलर बॉक्स बसविण्यात आले. तसेच पथदीप व हायमास्ट यांना वीजपुरवठा करण्यासाठी फ्यूज पेट्या बसविण्यात आल्या. परंतु सध्या शहरातील बऱ्याच बॉक्सची दारे नसल्यामुळे ते धोकादायक ठरत आहेत. एखाद्याचा नकळत स्पर्श झाल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निष्पापाचा बळी जाण्यापूर्वीच फ्यूज पेट्या व बॉक्सची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
लोखंड चोरीचे आव्हान
फिडर पिलर बॉक्सला लावण्यात आलेली दारे लोखंडी असल्यामुळे त्यांची चोरी केली जात आहे. लोखंड गोळा करून ते भंगारात विकणारी टोळी बेळगावमध्ये सक्रीय असल्यामुळे त्यांच्याकडून लोखंड चोरीसाठी असे प्रकार केले जातात. लोखंडासाठी फिडर पिलर बॉक्स, फ्यूज पेट्या चोरल्या जात आहेत. परंतु यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून लोखंड चोरीचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान हेस्कॉमसमोर आहे.









