खेड / राजू चव्हाण :
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. दरडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने लोखंडी जाळ्या बसवण्याचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या ‘सुरक्षा कवचामुळे’ धुवाँधार पर्जन्यवृष्टीदरम्यान कोसळणाऱ्या दरडींसह मातीचा भराव महामार्गावर येण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. यामुळे वाहनचालकांनी तूर्तास सुटकेचा निःश्वास टाकला आहे. हा ‘उतारा’ कितपत प्रभावी ठरतो, यावरच वाहनचालकांची सुरक्षितता अवलंबून आहे.
कशेडी घाटात २००५ पासून दरडी कोसळण्याचा लागलेला कलंक आजमितीसही कायमच आहे. अपघातांचेही सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांसह राष्ट्रीय महामार्ग खात्याची डोकेदुखी कायम आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या उभारणीमुळे पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू असल्याने वाहनचालक बोगद्यातूनच मार्गस्थ होण्यास सर्वाधिक पसंती देत आहेत.
यामुळे कशेडी घाटातील वाहतूक काहीअंशी रोडावली आहे चौपदरीकरणादरम्यान डोंगराचा भाग कापण्यात आल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, कापलेल्या डोंगराच्या उतारातून माती आणि दगड महामार्गावर कोसळून वाहतुकीत नवा अडसर निर्माण झाला आहे. यामुळे जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. आठवडाभरापूर्वीच सलग दोनवेळा कशेडी घाटात दरडी कोसळून वाहतुकीला ब्रेक लागला होता. दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली होती. ती दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याला अखेर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास जाग आली आहे. सद्यस्थितीत कशेडी घाटातील चोळई, धामणदेवी आणि भोगाव या सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्रात लोखंडी जाळ्या बसवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
लोखंडी जाळ्या बसवण्याचा नवा अवलंब सुरू असल्याने कापलेल्या डोंगराच्या उतारावर पोलादी जाळी घट्टपणे बसवण्यात येत आहे. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल होणारी माती आणि लहान-मोठे दगड जाळीतच अडकून रस्त्यावर कोसळण्याचा धोका कमी होणार आहे. घाटातील दरडी रोखून प्रवाशांच्या मार्गातील अडसर दूर करण्यासाठी सुरू असलेला लोखंडी जाळ्या बसवण्याचा अवलंब कितपत तग धरतो, यावरच वाहनचालकांच्या सुरक्षित प्रवासाची सारी मदार अवलंबून आहे.
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी कशेडी घाटासह बोगद्यात चाकरमान्यांच्या मार्गात ऐनकेन कारणांनी ‘विघ्न’ उभे ठाकत असते. यंदा कशेडीचे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाल्याने चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. ही गणेशभक्तांसाठी दिलासादायक बाब ठरलेली असतानाच कशेडी घाटातील दरडी रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्याने चाकरमान्यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे.
कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू असली तरी घाटातूनही वाहने मार्गस्थ होत असतात. सुरक्षा जाळी बसवण्याच्या कामामुळे वाहनचालकांचा प्रवास यापुढे अधिक सुरक्षित होण्याच्या शक्यतेने प्रवासी सुखावले आहेत.








