अवजड वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : कॅम्प भागातून अवजड वाहतूक काही केल्याने थांबताना दिसत नाही. त्यामुळे मराठा लाईट इन्फंट्रीकडून पुन्हा एकदा मिलिटरी महादेव मंदिराजवळ लोखंडी कमान बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अवजड वाहतूक रोखण्यासाठी मिलिटरी महादेव मंदिर व अन्य ठिकाणी कमानी उभारण्यात येणार आहेत. कॅम्प परिसरात अनेक शाळा व मराठा लाईट इन्फंट्रीचे कार्यालय आहे.शहरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी बऱ्याचवेळा कॅम्प भागातून वाहतूक सुरू केली जाते. विशेषत: मोर्चे-आंदोलने असताना ही वाहने कॅम्पमधून बॉक्साईट रोडपर्यंत वळविली जातात. परंतु याचा परिणाम कॅम्पमध्ये होत आहे. अवजड वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकवेळा पालकांनी रास्तारोको करत आंदोलन केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून काही महिन्यांपूर्वी मिलिटरी महादेव मंदिर, ग्लोब थिएटर कॉर्नर, गांधी स्मारक याठिकाणी लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. परंतु यापैकी ग्लोब थिएटर कॉर्नर व मिलिटरी महादेव मंदिर येथील लोखंडी कमानी अवजड वाहनांच्या धडकेने मोडल्या. कॅन्टोन्मेंटने अवजड वाहनांना दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देऊनही वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे पुन्हा कमान उभारण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी मिलिटरी महादेवकडे जाणारा रस्ता बंद करून लोखंडी पोल घालण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कमान उभारणीचे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न होणार आहे.









