कौस्तुभ चाटे
क्रिकेट हा खरा ब्रिटिशांचा खेळ. 19 आणि 20 व्या शतकात त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला, आणि जगात अनेक ठिकाणी आपल्या वसाहती उभारल्या. ते ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे आपला लाडका खेळ म्हणजे क्रिकेट घेऊन गेले. अनेक देशांमध्ये त्यांनी क्रिकेटची पायाभरणी केली. आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि कॅरेबियन बेटांवर हा खेळ हळूहळू लोकप्रिय होत गेला. पण खुद्द युरोपात मात्र हा खेळ पसरण्यास थोडा वेळ गेला. कदाचित याला एक मुख्य कारण म्हणजे युरोपमधील हवामान. क्रिकेट हा मुख्यत? उन्हाळी खेळ. युरोपमध्ये सूर्यनारायणाचे दर्शन तसे कमीच. हवामान देखील पावसाला पोषक. खुद्द इंग्लंडच्या बाहेर जरी इतर काही देशांमध्ये क्रिकेट खेळले जात असेल तरीही त्याची प्रगती प्रथमवर्ग क्रिकेट (फर्स्ट क्लास) च्या पलीकडे गेली नव्हती. नेदरलँड्स, स्कॉटलँड सारखे काही देश एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसत होते, पण त्यांची कामगिरी देखील यथातथाच होती. 1877 मध्ये सुरु झालेल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात युरोपातून अजून एक देश कसोटीसाठी पात्र होण्यास 2018 साल उजाडले. 2017 साली आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांना ‘टेस्ट स्टेटस‘ देण्यात आले, आणि पुढील वर्षी म्हणजे 2018 मध्ये या दोन्ही देशांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आयर्लंड हा इंग्लंडचा सक्खा शेजारी. इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळवण्याचा आयर्लंडचा इतिहास देखील प्रेरणादायक आहे. इंग्लंड आणि इंग्रजांविरुद्ध या नागरिकांच्या मनात कायमच एक प्रकारचे कटुत्व आहे. अशावेळी इंग्रजांचा हा खेळ स्वीकारणे सोपे नक्कीच नव्हते. क्रिकेटने आयर्लंडमध्ये शिरकाव केला तो 1792 मध्ये. त्यावेळी आयर्लंडमध्ये ब्रिटिश सैन्य आणि आयरिश संघ यामध्ये काही सामने खेळवले गेल्याची इतिहासात नोंद आहे. पुढे 19 व्या शतकात काही क्रिकेट क्लब्सची सुरुवात झाली आणि ख्रया अर्थाने आयर्लंडमध्ये क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. पण मुळातच कडव्या आयर्लंडने क्रिकेटला फारसे जवळ केलेच नाही. फुटबॉल, रग्बी हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. जवळच असलेल्या इंग्लंडमध्ये आर्थिक सुबत्ता होती, त्यामुळे आयरिश माणूस तिकडे खेचला गेला नसता तरच नवल होते. हळूहळू त्या सुबत्तेबरोबरच इंग्रजांचा खेळ देखील त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली. काही आयरिश खेळाडू इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळत होते, चमकत होते. देशात क्रिकेटचे वारे वाहू लागले होते. अशावेळी, 1990 च्या दशकात आयर्लंडने आयसीसीचे सभासदत्व घेतले. असोसिएट नेशन म्हणून त्यांना मान्यता मिळाली आणि ख्रया अर्थाने क्रिकेट सुरु झाले. सुरुवातीचे दिवस खूपच खडतर होते. इथे ‘प्रोफेशनल‘ कमी आणि होतकरू खेळाडू जास्त होते. कोणी शिक्षक होता, कोणी अकाउंटंट तर कोणी कॅब ड्रायव्हर पण क्रिकेटने त्यांना बांधून ठेवायला सुरुवात केली. 2005 मध्ये आयर्लंड मध्ये आयसीसी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले. 2007 च्या विश्वचषकासाठी ही पूर्वतयारी होती. त्या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवून आयर्लंडने क्रिकेट जगताला एक प्रकारे धक्काच दिला. त्याच जोरावर त्यांनी 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवले. 2007 च्या त्या स्पर्धेत त्यांनी आधी पाकिस्तानला आणि नंतर बांगलादेशला हरवून खळबळ माजवली. पुढे 2011 च्या स्पर्धेत त्यांनी इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला आणि ख्रया अर्थाने त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले.
याच सुमारास क्रिकेट विश्वात अनेक घडामोडी होत होत्या. टी-20 क्रिकेट आपले पाय पसरू लागलं होतं, कसोटी क्रिकेटमध्येही काही बदल व्हावे ही मागणी होऊ लागली होती. कसोटी क्रिकेट खेळण्राया संघांमध्ये वाढ व्हावी ही मागणी जोर धरू लागली होती. अशावेळी आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांना कसोटी क्रिकेटचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मान्य झाला. 2018 मध्ये आधी आयर्लंडने आणि नंतर अफगाण संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयर्लंडचा पहिला कसोटी सामना डब्लिन जवळील ‘मलाहाईड‘ येथे पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला. आयर्लंड साठी ही सुवर्णसंधी होती. बलाढ्या पाकिस्तान विरुद्ध ते पदार्पण करणार होते. विल्यम पोर्टरफिल्डच्या नेतृत्वाखाली आयरिश संघ मैदानात उतरला. संघात एड जॉईस, बॉइड रॅनकीन सारखे कसोटी क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू होते. त्यांनी आधी इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेट खेळले होते. त्याचबरोबर केव्हिन ओब्रायन, अँडी बल्बरनी सारखे चांगल्या दर्जाचं एकदिवसीय आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले खेळाडू देखील होते. त्यामुळे या ‘ग्रीन आर्मी‘ कडे क्रिकेट जगताचे लक्ष होते. आयर्लंड संघाची कामगिरी देखील चांगली झाली. त्यांनी पाकिस्तान संघाला जेरीस आणले होते, पण पाकिस्तान संघाचा अनुभव कामी आला. पहिल्या डावात आयर्लंड संघाने ठीकठाक कामगिरी केली, पण दुस्रया डावात मात्र त्यांनी कडवा प्रतिकार केला. केव्हिन ओब्रायनने या डावात 118 धावांची खेळी केली. आयर्लंड साठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. दुर्दैवाने आयर्लंड संघाला पराभव स्वीकारावा लागला.
2018 नंतर आजपर्यंत आयर्लंड संघाने एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत. पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या देशांविरुद्ध आयर्लंड संघ कसोटी क्रिकेट खेळला आहे. बहुतेकवेळी एक किंवा दोन कसोटी सामन्यांची मालिका असे या मालिकांचे स्वरूप आहे. दुर्दैवाने आजही आयरिश संघाला वर्षातून एखाद दोन कसोटी खेळण्याची संधी मिळते आहे. अर्थात कसोटी क्रिकेटच कमी झाले असल्याने त्यांना मिळण्राया संधी मर्यादित असणार आहेत. सलग सात कसोटी सामने हरल्यानंतर 2023-24 नंतर आयर्लंड संघाने गेले 3 सामने जिंकले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानचा एकदा तर झिम्बाब्वे संघाचा दोन वेळा पराभव केला आहे. 2025 मध्ये देखील आयरिश संघ इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळेल. अर्थात त्यांचे एकदिवसीय आणि टी-20 सामने मोठ्या प्रमाणावर असतील. आयसीसीने आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघांचे अजून मोठ्या प्रमाणावर कसोटी सामने खेळवले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे क्रिकेट अजूनच सुधारेल.
आयर्लंड संघाने आपल्या छोट्या कालावधीत देखील काही चांगले खेळाडू क्रिकेट विश्वाला दिले आहेत. इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार – आयॉन मॉर्गन हा देखील मूळचा आयरिशच. तो 2006 ते 2009 या कालावधीत आयर्लंडसाठी खेळत होता, आणि पुढे त्याने इंग्लंड संघाकडून खेळण्यास पसंती दिली. केव्हिन आणि नायल ओब्रायन, पोर्टरफिल्ड, बल्बरनी, पॉल स्टर्लिंग सारख्या खेळाडूंनी आयरिश क्रिकेट वाढवायला मदत केली आहे. जॉर्ज डॉकरेल सारख्या खेळाडूची देखील ब्रयापैकी चर्चा झाली. आयर्लंडच्या सध्याच्या संघातील कर्टीस कॅम्फर, हॅरी टेक्टर, पीटर मूर लोर्कान टकर सारखे खेळाडू आयरिश क्रिकेटला चांगली दिशा देतील अशी अपेक्षा आहे. आज आयर्लंड झिम्बाब्वे, अफगाण अशा संघांविरुद्ध क्रिकेट खेळताना दिसतो पण ऑस्ट्रेलिया, भारत अशा मोठ्या संघांविरुद्ध त्यांचे कसोटी सामने खेळवले गेल्यास त्याचा आयर्लंड क्रिकेटलाच मोठा फायदा होईल.
11 मे 2018 रोजी आयर्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज त्या घटनेला 8 वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत आयर्लंड संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नसली तरी दुर्लक्षिण्याजोगी निश्चितच झालेली नाही. युरोपातून कसोटी क्रिकेट खेळणारा दुसरा संघ म्हणून आयर्लंडकडे बघितले जाते. आता गरज आहे ते म्हणजे या संघाने मोठी झेप घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये अजून चांगली कामगिरी करण्याची. अनेक आयरिश खेळाडू इंग्लिश काउंटी क्रिकेट खेळताना दिसतात, त्यामुळे त्यांना मोठमोठ्या, चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव निश्चित आहे, आता या संघाने भरारी घेणे आवश्यक आहे. हा 8 वर्षांचा कालावधी आयर्लंडसाठी कठोर काळ ठरला आहे हे नक्की, आयर्लंडने हे सर्व एका प्रतिकूलतेतून साध्य केलं आहे, आणि त्यामुळेच कसोटी क्रिकेटला त्यांच्याकडून काहीतरी वेगळं, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी नक्कीच मिळू शकेल.









