दुसरी कसोटी : आयर्लंडचा पहिला डाव 492, लंका बिनबाद 81
वृत्तसंस्था/ गॅले
कसोटी क्रिकेटच्या आपल्या अल्पशा इतिहासामध्ये आयर्लंडने येथे सुरू असलेल्या यजमान लंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 492 धावांचा डोंगर रचला. कसोटी क्रिकेटमधील आयर्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. फलंदाजीस अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर मंगळवारी दुसऱ्या दिवसाअखेर लंकेने पहिल्या डावात बिनबाद 81 धावा जमवल्या.
आयर्लंडने 4 बाद 319 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आयर्लंडच्या डावामध्ये पॉल स्टर्लिंग आणि कर्टिस कॅम्फर यांनी दमदार शतके झळकवली. कर्णधार बलबर्नीचे शतक 5 धावांनी हुकले. टकेरने 80 धावा झोडपल्या. दुखापतीमुळे खेळाच्या पहिल्या दिवशी निवृत्त झालेला स्टर्लिंग मंगळवारी पुन्हा मैदानात फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने असिता फर्नांडोच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत आपले हे शतक पूर्ण केले. स्टर्लिंगने 181 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारासह 103 धावा झळकवल्या. सोमवारी नाबाद राहिलेला टकर केवळ दोन धावांची भर घालत तंबूत परतला. विश्वा फर्नांडोने टकेरचा त्रिफळा उडवला. त्याने 106 चेंडूत 10 चौकारासह 80 धावा झळकवल्या. कॅम्फर आणि स्टर्लिंग यांनी सहाव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली. कॅम्फरने 229 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारासह 111 धावा झळकवल्या. उपाहारावेळी आयर्लंडने 6 बाद 399 धावापर्यंत मजल मारली होती. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कॅम्फर आणि मॅकब्राईन यांनी सातव्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली. मॅकब्राईनने 1 षटकार आणि 3 चौकारासह 35 धावा झळकवल्या. चहापानावेळी आयर्लंडचा पहिला डाव 145.3 षटकात 492 धावात आटोपला. लंकेतर्फे प्रभात जयसुर्याने 174 धावात 5 तर विश्वा फर्नांडो आणि असिथ फर्नांडो यांनी प्रत्येकी दोन तसेच रमेश मेंडिसने एक गडी बाद केला.
निशान मधुशका आणि कर्णधार करुणारत्ने यांनी शेवटच्या सत्रात सावध फलंदाजी करत 18.1 षटकात बिनबाद 81 धावा जमवल्या. मधुशका 6 चौकारासह 41 तर करुणारत्ने 6 चौकारासह 39 धावावर खेळत आहे. लंकेचा गोलंदाज प्रभात जयसुर्याने आपल्या सातव्या कसोटीमध्ये बळींचे अर्धशतक पूर्ण केले. आयर्लंडचा हा सातवा कसोटी सामना आहे.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड पं. डाव 145.3 षटकात सर्वबाद 492 (बलबर्नी 95, टेक्टर 18, पॉल स्टर्लिंग 103, टकर 80, कॅम्फर 111, मॅकब्राईन 35, ह्युम 6, अवांतर 22, प्रभात जयसुर्या 5-174, व्ही. फर्नांडो 2-92, ए. फर्नांडो 2-78, रमेश मेंडिस 1-108), लंका प. डाव 18.1 षटकात बिनबाद 81 (मधुशका खेळत आहे 41, करुणारत्ने खेळत आहे 39).