वृत्तसंस्था/ राजकोट
राजकोट येथे झालेल्या भारताविऊद्धच्या पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यानंतर आयर्लंडची डावखुरी ऑफस्पिनर एमी मॅग्वायर हिच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी तक्रार करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात या 18 वर्षीय खेळाडूने 8 षटकांत 57 धावा देऊन 3 बळी घेतले होते.
आयर्लंड संघ व्यवस्थापनाला देण्यात आलेल्या सामनाधिकाऱ्यांच्या अहवालात मॅग्वायरच्या गोलंदाजीच्या शैलीच्या वैधतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आयसीसीला ‘क्रिकेट आयर्लंड’ला औपचारिकपणे सूचित करावे लागले असून भारताविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यानंतर गोलंदाजीच्या संशयास्पद अवैध शैलीबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे याची त्यात पुष्टी करण्यात आली आहे.
2023 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या आणि सर्व प्रकारांत 20 सामन्यांतून 25 बळी घेतलेल्या मॅग्वायरची आता पुढील 14 दिवसांत आयसीसी मान्यताप्राप्त चाचणी केंद्रात तिची गोलंदाजीची शैली आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करते की नाही हे तपासण्यासाठी चाचणी घेतली जाईल. आयसीसीच्या चौकशी प्रक्रियेनुसार, चाचणी निकाल येईपर्यंत तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास परवानगी राहील. ‘क्रिकेट आयर्लंड’ने मॅग्वायरला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.









