झिंबाब्वेचा सहा गड्यांनी पराभव, कॅम्फर सामनावीर, मध्वेरे, सिकंदर रझाची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ हरारे
सामनावीर कर्टीस कॅम्फरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तसेच कर्णधार स्टर्लिंगच्या अर्धशतकामुळे रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडने यजमान झिंबाब्वेचा 8 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे आयर्लंडने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पहिला सामना झिंबाब्वेने जिंकला होता.
या दुसऱ्या समान्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वेचा डाव 49 षटकात 245 धावांत आटोपला. त्यानंतर आयर्लंडने 48.4 षटकात 4 बाद 249 धावा जमवित विजय नोंदविला.
झिंबाब्वेच्या डावामध्ये सिकंदर रझा आणि मधवेरे यांनी शानदार अर्धशतके झळकाविली. सलामीच्या बेनेटने 34 चेंडूत 6 चौकारांसह 30 धावा जमविल्या. बेन करेनने 36 चेंडूत 1 चौकारासह 18 धावा केल्या. कर्णधार एर्विन 4 धावांवर त्रिफळाचीत झाला. झिंबाब्वेची यावेळी स्थिती 3 बाद 77 अशी होती. मधवेरे आणि सिकंदर रझा या जोडीने संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. मधवेरेने 70 चेंडूत 6 चौकारांसह 61 तर सिकंदर रझाने 75 चेंडूत 5 चौकारांसह 58 धावा जमविल्या. कॅम्फबेल 2 धावांवर बाद झाला. मेरुमनीला खातेही उघडता आले नाही. वेलिंग्टन मासाकेझाने 35 चेंडूत 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. 49 षटकात झिंबाब्वेचा डाव 245 धावांवर आटोपला. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेरने 54 धावांत 4 तर कॅम्फरने 13 धावांत 3 तसेच हुमे, लिटल आणि मॅकब्रिने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिंबाब्वेच्या डावात 24 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 43 धावा जमविताना 1 गडी गमाविला. मधवेरेने 50 चेंडूत 5 चौकारांसह तर सिकंदर रझाने 69 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये झिंबाब्वेने 62 धावा जमविताना 4 गडी गमाविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावाला बऱ्यापैकी सुरुवात झाली नाही. डावातील सहाव्या षटकात सलामीचा बेलबिरेनी झेलबाद झाला. त्याने 20 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. कॅम्फर आणि कर्णधार स्टर्लिंग यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 144 धावांची शतकी भागिदारी केली. डावातील 35 व्या षटकात कॅम्फर पायचीत झाला. त्याने 94 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 63 धावा जमविल्या. टेक्टर केवळ 7 धावांवर झेलबाद झाला. संघाचे द्विशतक फलकावर लागले असताना कर्णधार स्टर्लिंग सोपा झेल देत तंबूत परतला. त्याने 102 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 89 धावा झळकाविल्या. टकेर आणि डॉक्रेल या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना पाचव्या गड्यासाठी अभेद्य 49 धावांची भागिदारी केली. टकेरने 48 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 36 तर डॉक्रेलने 20 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 23 अवांतर धावा मिळाल्या. झिंबाब्वेतर्फे ग्वांदूने 50 धावांत 2 तर निगरेव्हा आणि मुझारबनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 57 धावा जमविताना 1 गडी गमाविला. दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 143 धावा जमविताना 3 गडी गमाविले. शेवटच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 49 धावा केल्या.
संक्षिप्त धावफकल : झिंबाब्वे 49 षटकात सर्वबाद 245 (मधवेरे 61, सिकंदर रझा 58, मासाकेझा 35, बेनेट 30, करेन 18, निगरेव्हा नाबाद 17, अवांतर 18, मार्क अॅडेर 4-54, कॅम्फर 3-13, हुमे, लिटल, मॅकब्रिने प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड 48.4 षटकात 4 बाद 249 (स्टर्लिंग 89, कॅम्फर 63, बेलबिरेनी 11, टेक्टर 7, टकेर नाबाद 36, डॉक्रेल नाबाद 20, अवांतर 23, ग्वांदू 2-50, निगरेव्हा आणि मुझारबनी प्रत्येकी 1 बळी).









