वृत्तसंस्था / बुलावायो
येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आयर्लंडने यजमान झिम्बाब्वेचा 63 धावांनी पराभव केला. या सामन्यात आयर्लंडच्या अॅन्डी मॅकब्राईनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
याकसोटीत आयर्लंडचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला. मॅकब्रिनेने 132 चेंडूत 12 चौकारांसह 90 तर मार्क अॅडेरने 13 चौकारांसह 78 धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे मुझारबनीने 58 धावांत 7 तर निग्रेव्हाने 65 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात 267 धावा जमवित आयर्लंडवर 7 धावांची आघाडी घेतली. झिम्बाब्वेच्या डावात वेल्चने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 90, कॅटेनोने 3 चौकारांसह 26, मध्वेरेने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, मुझारबनीने 6 चौकारांसह 47 धावा केल्या. आयर्लंडतर्फे मॅक्रेथीने 75 धावांत 4 तर मॅकब्रिनेने 59 धावांत 3 तसेच अॅडेरने 56 धावांत 2 गडी बाद केले.
आयर्लंडने दुसऱ्या डावात 298 धावा जमवित झिम्बाब्वेला विजयासाठी 292 धावांचे आव्हान दिले. आयर्लंडच्या डावामध्ये कर्णधार बेलबिरेनीने 2 चौकारांसह 66, मुरने 5 चौकारांसह 30, कॅम्फरने 6 चौकारांसह 39, स्टर्लिंगने 2 षटकार आणि 1 चौकारासह 21, टकेरने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 58, मॅकब्रिनेने 16 तर अॅडेरने 15 धावा जमविल्या. झिम्बाब्वेतर्फे निग्रेव्हाने 55 धावांत 4 तर गेवांदु आणि मध्वेरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर झिम्बाब्वेचा दुसरा डाव 228 धावांत आटोपला. मध्वेरेने एकाकी लढत 8 चौकारांसह 84, बेनेटने 3 चौकारांसह 45, कर्णधार कॅम्पबेलने 3 चौकारांसह 33, कॅटेनो आणि निग्रेव्हा यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. आयर्लंडतर्फे हंप्रेजने 57 धावांत 6 तर मॅक्रेथीने 22 धावांत 2 तसेच अॅडेर आणि मॅकब्रिने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड प. डाव 260, झिम्बाब्वे प. डाव 267, आयर्लंड दु. डाव 298, झिम्बाब्वे दु. डाव सर्वबाद 228









