इस्रायलने केला अचूक हल्ला, संघर्ष भडकणार
वृत्तसंस्था / तेल अवीव, तेहरान
इस्रायलने केलेल्या अचूक वायुहल्ल्यात इराणचे युद्धकालीन सेनाप्रमुख अली शदमानी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ते इराणचे सर्वेसर्वा शासक आणि धर्मगुरु अली खमेनी यांचे प्रमुख सल्लागारही होते. ते ठार झाल्यामुळे इराणची मोठी हानी झाल्याचे मानण्यात येत असून आता हा संघर्ष अधिक भडकणार, अशी स्थिती सध्यातरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
शदमानी हे इराणच्या सेनेचे सर्वात वरीष्ठ कमांडर होते. तसेच त्यांची गणना सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी सेनाधिकाऱ्यांमध्ये केली जात होती. इराणच्या युद्धकाकलीन सेनाप्रमुख इस्रायलकडून ठार होण्याची ही गेल्या पाच दिवसांमधील दुसरी घटना आहे. इराणमधील इस्रायलच्या गुप्तहेरांनी शदमानी यांच्या ठावठिकाण्याची अचूक माहिती दिल्याने असा हल्ला करणे शक्य झाले. त्यामुळेच शदमानी यांना कंठस्नान घालण्यात आले, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
आणखी दोन अधिकारी ठार
तेहरान टाईम्स या इराणमधील सरकारी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार इस्रायलने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात शदमानी यांच्यासह आणखी दोन ज्येष्ठ लष्करी अधिकारीही मारले गेले आहेत. हसन मोहाघेह आणि मोहसीन बाकेरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यापैकी मोहाघेह हे इराणच्या प्रशासनाचे उपाधिकारी होते, तर बाकेरी हे इराणच्या क्रांतीकारी सेनेचे कमांडर होते.
जी-7 चा इस्रायलला पाठिंबा
कॅनडात होत असलेल्या जी-7 संघटनेच्या शिखर परिषदेने इस्रायल-इराण संघर्षावर आपले वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. ही परिषद इस्रायलला पाठिंबा व्यक्त करीत आहे. इस्रायलला स्वत:च्या संरक्षणाचा अधिकार आहे. इराणने मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले असून त्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे, असे जी-7 देशांनी एकमुखी प्रसिद्धीस दिलेल्या वक्तव्यात स्पष्ट केले.
मंगळवारीही हल्ले-प्रतिहल्ले
मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही इस्रायल आणि इराण यांनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. इस्रायलने मोठा वायुहल्ला करुन इराणची वीजनिर्मिती केंद्रे, नैसर्गिक वायु उत्खनन केंद्रे तसेच इराणचे अनेक महत्वाचे लष्करी अधिकारी यांना लक्ष्य केले. याच हल्ल्यांमध्ये शदमानी आणि दोन अधिकारी ठार झाले. इराणनेही इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तथापि, बहुतेक क्षेपणास्त्रे आकाशातच निकामी करण्यात इस्रायलला यश आले. काही क्षेपणास्त्र नागरी वस्त्यांवर कोसळली. मात्र, आधीपासून नागरीकांनी सावधानता बाळगली असल्याने इस्रायलची हानी फारशी झालेली नाही, असे दिसून येत आहे. आतापर्यंत गेल्या पाच दिवसात इस्रायलचे 25 नागरीक मृत्यूमुखी पडले आहेत. तर इराणच्या नागरीकांची जीवीतहानी जवळपास 280 इतकी आहे.
चर्चेसाठी प्रयत्न
इस्रायल आणि इराण यांनी सशस्त्र संघर्ष थांबवून चर्चा करावी, असा प्रयत्न काही देशांकडून होत आहे. हा संघर्ष चिघळल्यास त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतील, अशी शक्यता जगभरातील अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबाँब बनवू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. त्यामुळे चीनने त्यांच्यावर टीका केली आहे. ट्रंप संघर्षात तेल ओतून तो अधिक भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे चीनचे म्हणणे आहे. भारताने संघर्ष थांबविण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले आहे. फ्रान्स आणि ब्रिटनही याच मताचे असल्याचे दिसत आहे. या संघर्षाचे भवितव्य प्रामुख्याने अमेरिकेच्या हाती आहे. अमेरिका दोन्ही देशांना चर्चेच्या मेजावर आणू शकते, असे मत अनेक देशांनी व्यक्त केले आहे.









