स्टॉपेज टाईममधील दोन गोलांमुळे वेल्सवर मात
वृत्तसंस्था/ कतार
येथील अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गट ब मधील सामन्यात इराणने स्टॉपेज टाईलममध्ये नोंदवलेल्या दोन गोलांच्या जोरावर वेल्सवर 2-0 अशा फरकाने विजय मिळविला.
या विजयामुळे इराणने बाद फेरी गाठण्याचे आव्हान जिवंत राखले आहे. रूझबेह चेशमीने स्टॉपेज टाईममधील आठव्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवला. बॉक्सच्या बाहेरून चेशमीने मारलेला फटक्यावर सूर मारून अडवण्याचा प्रयत्न वेल्सचा बदली गोलरक्षक डीनी वार्डने केला. पण चेंडूला जाळय़ात जाण्यापासून तो रोखू शकला नाही. 86 व्या मिनिटाला नियमित गोलरक्षक वेन हेनेसीला लाल कार्ड दाखविल्याने त्याला मैदानाबाहेर पडावे लागले. त्यामुळे बदली गोलरक्षक डॅनी वार्डला तैनात करण्यात आले होते. कतार वर्ल्ड कपमधील हे पहिले रेड कार्ड होते. हेनेसीने इराणच्या मेहदी तारेमीला धक्काबुक्की केल्याने त्याला रेड कार्ड मिळाले होते. रमिन रेझीयानने काही क्षणानंतर आणखी एका गोलाची भर घातल्यानंतर इराणच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला. यावेळी वेल्सच्या चकित झालेल्या काही खेळाडूंनी मैदानात धाव घेतली होती.
वेल्सच्या गॅरेथ बेलचा हा 110 वा सामना होता. राष्ट्रीय संघाचे सर्वाधिक सामन्यात प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम त्याच्या नावे नोंद झाला आहे. इराणचे आता 3 गुण झाले असून वेल्सच्या खात्यात एक गुण जमा झाला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी अमेरिकेला गोलशून्य बरोबरीत रोखल्याने त्यांना एक गुण मिळाला होता. मंगळवारी वेल्सचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध तर इराणचा सामना अमेरिकेशी होणार आहे.
इराणच्या खेळाडूंनी गायले राष्ट्रगीत
वेल्सविरुद्ध सामना सुरू होण्यापूर्वी इराणचे खेळाडू राष्ट्रगीत वाजवण्यात आले, त्यावेळी त्यांनीही प्रतिसाद देत राष्ट्रगीत गायन केले. गेल्या आठवडय़ात इंग्लंडविरुद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यावेळी इराणी खेळाडूंनी राष्ट्रगीत गाण्याचे टाळले होते. गेल्या दोन महिन्यापासून इराणमध्ये सरकारविरोधात हिजाबसंदर्भात आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला होता. येथे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर इराणी प्रेक्षकांनी टर उडविली. पण खेळाडू मात्र शांतपणे राष्ट्रगीत गायन करताना दिसले.
आजचे सामने
1) टय़ुनिशिया वि. ऑस्ट्रेलिया
वेळ ः दुपारी 3.30 वा.
2) पोलंड वि. सौदी अरेबिया
वेळ ः सायं. 6.30 वाजता
3) फ्रान्स वि. डेन्मार्क
वेळ ः रात्री 9.30 वा.
4) अर्जेन्टिना वि. मेक्सिको
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.









