वृत्तसंस्था / जम्मू काश्मिर
कोरोनानंतर पहिल्यांदाच दंगल समिती, चंद्रकोटने पोलीस व सैन्याच्या संयुक्त विद्यमाने ‘दंगल’चे आयोजन केले होते. या मैदानात इराणचा अहमद मिर्झा पुरियाने पंजाबच्या बुपिंदर अजनालाचा पराभव करुन हे मैदान मारले.
जम्मू काश्मिर या डोंगराळ जिल्ह्यात सोमवारी पाच वर्षानंतर ‘दंगल’ हे मैदान भरविण्यात आले होते. या मैदानात 50 हून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल दाखल झाले होते. रामबनचे आमदार अर्जुन सिंग यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सीमेपलिकडे दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सिंदूर’ ऑपरेशन राबविले. त्यात यशही आले. त्यानंतर जम्मू काश्मिरमधील परिस्थिती निवळली. ‘सिंदूर’ या ऑपरेशनमुळे जगामध्ये आपले सैन्य खूप मजबूत आहे आणि कोणताही धोका नसल्याचा संदेश जगासमोर आला आहे. दरम्यान आता आपल्या देशातील बंधुत्व व एकीला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांना हे मैदान भरवून आपण चांगले उत्तर दिल्याचे ते म्हणाले. याचबरोबर स्थानिक तरुणांना यामध्ये सहभागी होण्याचे आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामबनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कुलबीर सिंग यांनी उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. अशा क्रीडा प्रकारांच्या उपक्रमांना पोलीस नेहमीच पाठिंबा देतात आणि प्रोत्साहन देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी माजिद अली, नागरिक व संयोजकांचे आभार मानण्यात आले.









