बैठकीदरम्यान झाला होता इस्रायलचा हल्ला
वृत्तसंस्था/ तेहरान
इस्रायलसोबत 12 दिवसांपर्यंत चाललेल्या युद्धादरम्यान इराणचे राष्ट्रपती मसुद पेजेश्कियान हे एका हल्ल्यात जखमी झाले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोरशी (आयआरजीसी) संबंधित फार्स न्यूज एजेन्सीने रविवारी ही माहिती दिली आहे. 16 जून रोजी इराणची राजधानी तेहरानवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात राष्ट्रपती पेजेश्कियान जखमी झाले होते. पेजेश्कियान हे वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सामील असताना हा हल्ला झाला होता. बैठकीत सामील अनेक जण यात जखमी झाले होते.
हल्ल्यामुळे पेजेश्कियान यांच्या पायाला दुखापत झाली होती. ही बैठक युद्ध सुरू झाल्याच्या 4 दिवसांनी म्हणजेच 16 जून रोजी तेहरानच्या पश्चिम हिस्स्यात स्थित एका इमारतीत आयोजित करण्यात आली होती. इमारतीच्या खालील हिस्स्यात झालेल्या या बैठकीत इराणचे राष्ट्रपती, संसद अध्यक्ष आणि न्यायपालिकेचे प्रमुख सामील होते.
नसरल्लाहच्या हत्येसारखे ऑपरेशन
हे ऑपरेशन हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहच्या हत्येसारखेच होते. इस्रायलने लेबनॉनमधील इराणचे समर्थनप्राप्त दहशतवादी गट हिजबुल्लाहचा तत्कालीन प्रमुख हसन नसरल्लाहच्या च्या बैरूत येथील मुख्यालयावर हल्ला केला होता. नसरल्लाह हा संघटनेच्या वरिष्ठ कमांडर्ससोबत भूमिगत मुख्यालयात बैठक करत असताना इस्रायलने घातक हल्ला केला होता.
इराणची मोठी हानी
इस्रायलने 12 जून रोजी इराणवर हवाई हल्ला केला होता. 12 दिवसांपर्यंत चाललेल्या या युद्धात इस्रायलने आयआरजीसीचे वरिष्ठ नेतृत्व, कमांडर्स आणि अणुशास्त्रज्ञांना यमसदनी पाठविले आहे. 13 जून रोजी इराणवरील प्रारंभिक हल्ल्यातच इस्रायलने आयआरजीसी कमांडर मेजर जनरल होसैन सलामी, इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरीला ठार केले होते. तसेच तेथील वायुदल कमांडर अमीर अली हाजीजादेह आणि अन्य वरिष्ठ इराणी वायुदल अधिकाऱ्यांनाही इस्रायलने संपविले आहे.









