हुक्केरी पोलिसांची कारवाई : चंदगड येथील चोरीचीही कबुली
प्रतिनिधी / बेळगाव
सराफी व्यावसायिकांचे लक्ष विचलित करून दागिने चोरणाऱया पुणे येथील इराणी टोळीतील दोघा जणांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 9 लाख 58 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या टोळीने चंदगड तालुक्मयातही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या महिन्यात हुक्केरी येथील विद्या ज्वेलरी या सराफी पेढीत सराफाचे लक्ष विचलित करून दागिने लांबविल्याची घटना घडली होती. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक एम. एम. तहसीलदार, उपनिरीक्षक एल. एल. पत्तेण्णावर, साहाय्यक उपनिरीक्षक ए. एस. सनदी, आर. एम. यरगट्टी, मंजुनाथ कब्बूर, जी. एस. कांबळे, एस. आर. रामदुर्ग, यु. वाय. अरभावी, ए. एल. नायक, एल. बी. हंजानट्टी, रावसाहेब बोमनाळ आदींचा समावेश असलेल्या पथकाने याचा तपास हाती घेतला होता.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील सराफी पेढय़ात चोरी करणाऱया पुणे येथील खतरनाक इराणी टोळीतील जोडगोळीला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी हुक्केरी येथील एका किराणा दुकानातही चोरी केली होती. मुडलगी व चंदगड (जि. कोल्हापूर) येथील सराफी दुकानातील चोरीचीही कबुली दिली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हुक्केरीतील किराणा दुकानातील चोरीप्रकरणी 2 लाख 8 हजार रुपये रोकड व सराफी पेढीत झालेल्या चोरीप्रकरणी 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या टोळीतील आणखी दोघे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. तब्बल आठ वर्षांनंतर इराणी टोळीतील गुन्हेगारांना बेळगाव जिल्हय़ात अटक झाली आहे.









