व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य : हिंडलगा कारागृहात रवानगी : 14 लाखांचा ऐवज जप्त
बेळगाव : व्हिसाची मुदत संपून एक वर्ष झाले तरी भारतात राहून अनेक गुन्हे करणाऱ्या चार इराणी नागरिकांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देशपांडे गल्ली येथील सुकामेव्याच्या दुकानात चोरी केल्याच्या आरोपावरून खडेबाजार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. बहामन अब्दुलहुसेन बिनियाज (वय 36), श्रीमती हबीब हसन मोगल (वय 60), श्रीमती सईदा गुलाम करीमजादेह (वय 20), करीम अहमद दावलू (वय 27) सर्व राहणार तेहरान, इराण अशी त्यांची नावे आहेत. त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, एम. व्ही. अरळगुंडी, व्ही. वाय. गुडीमेत्री, जी. पी. अंबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्यानंतर केवळ 26 तासात या चौकडीला अटक केली आहे.
त्यांच्याजवळून दिल्ली पासिंगची एक कार, सात मोबाईल संच व रोकड जप्त करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शगुन ट्रेडर्स या सुकामेव्याच्या दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील 50 हजार रुपयांचे नोटांचे बंडल पळविण्यात आले होते. पोलिसांनी कारसह एकूण 14 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यापूर्वी त्यांनी हैद्राबादमध्येही गुन्हे केल्यास पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हे चौघे जण केवळ महिनाभरासाठी गेल्या वर्षी प्रवासी व्हिसा घेऊन भारतात आले होते. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही त्यांनी मायदेशी परतले नाहीत. उलट भारतातील वेगवेगळ्या राज्यात लक्ष विचलित करून लुटण्याचे गुन्हे त्यांनी केले आहेत. त्यांच्यावर खडेबाजार पोलिसांनी कलम 14ए (बी) द फॉरेन अॅक्ट-1946 अन्वयेही एफआयआर दाखल केला आहे.









