वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
2022-23 राष्ट्रीय क्रिकेट हंगामाच्या अखेरीस होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्याला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. शेष भारत आणि रणजी चषक विजेत्या मध्यप्रदेश यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. शेष भारत संघाचे नेतृत्व मयांक अगरवालकडे सोपवण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत इराणी करंडक स्पर्धेला म्हणावी तसी प्रसिद्धी मिळत नाही. राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी शेष भारत संघाचा कर्णधार मयांक अगरवालला या सामन्यात दर्जेदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावे लागेल. गेल्या वर्षी सलामीला फलंदाजी करणाऱ्या मयांक अगरवालला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत अगरवालकडून चांगली कामगिरी झाली नव्हती. तर नुकत्याच झालेल्या रणजी स्पर्धेत अगरवालने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत सर्वाधिक म्हणजे 990 धावा जमवल्या आहेत. या सामन्यात मध्यप्रदेशला रजत पाटीदार आणि कर्णधार आदित्य श्रीवास्तव याची उणीव भासेल. वेगवान गोलंदाज आवेश खान, यश दुबे हे मध्यप्रदेश संघातील प्रमुख खेळाडू आहेत.









