सुलेमानच्या हत्येचा बदला घेण्याचा इशारा
वृत्तसंस्था / बगदाद
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी इराणच्या कमांडरनी दिली आहे. जर देवाची इच्छा असेल तर आम्ही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तत्कालीन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांना नक्कीच ठार करू, असे रिव्होल्युशनरी गार्ड एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह म्हणाले. तसेच आम्हाला इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्व लष्करी कमांडर्सना मारायचे असल्याची दर्पोक्तीही त्यांनी व्यक्त केली आहे. याआधीही इराणच्या काही नेते आणि कमांडर यांनी सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे.
3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने आणि सीआयएने संयुक्तपणे इराणच्या विशेष दलाचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली. जनरल कासिम इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्यासाठी प्रसिद्ध होते. सुलेमानीच्या मृत्यूनंतर इराणने 7-8 जानेवारी 2020 रोजी बगदादमधील अमेरिकन दुतावासावर हल्ला केला होता. इराणचे सर्वोच्च नेते अली हसन खमेनी यांनी सुलेमानी मारल्यानंतर सर्व अमेरिकन सैन्याला पश्चिम आशियातून बाहेर काढण्याचे वक्तव्य केले होते.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कमांडर हाजीजादेह यांनी सुलेमानच्या हत्येचा बदला घेण्याचा आमचा विचार असल्याचे स्पष्ट केले. तसेच इराणने 1,650 किमी पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र बनवले आहे. या पावेह क्रूझ क्षेपणास्त्राचा इराणच्या उर्वरित क्षेपणास्त्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2020 मध्ये बगदादमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात सुलेमानी मारला गेल्यानंतर आम्ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात आम्हाला कोणत्याही सैनिकाला मारायचे नव्हते, असे त्यांनी सांगितले.









