इराण-उझ्बेकिस्तान लढतीतील एक क्षण.
वृत्तसंस्था/ तेहरान
उझ्बेकिस्तानविरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत राखत यजमान इराणने 2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. इराणचे दोन्ही गोल मेहदी तरेमीने नोंदवले.
तरेमीने 83 व्या मिनिटाला इराणचा दुसरा गोल नोंदवून बरोबरी साधून दिली. या अनिर्णीत सामन्यातील एका गुणामुळे इराणला सलग चौथ्यांदा विश्वचषक स्पधेंसाठी पात्रता मिळाली. या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची त्यांची ही एकूण सातवी वेळ आहे. 48 संघांचा सहभाग असलेली ही विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा, मेक्सिको येथे होणार आहे.
अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने हांगझाऊ येथील सामन्यात चीनवर 2-0 असा विजय मिळवित वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. चीनचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पूर्वार्धातच जॅक्सन आयर्व्हिन व निशान वेलुपिल्ले यांनी ऑस्ट्रेलियाचे गोल नोंदवले. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावरील सौदी अरेबियापेक्षा तीन गुणांनी पुढे आहे. तीन गटातील अव्वल दोन संघ असे एकूण सहा आशियाई संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील तर तिसरे व चौथे स्थान मिळविणारे संघ आणखी दोन स्थानांसाठी पुढील टप्प्यात खेळतील.









