भारतासोबत मैत्री शक्य नाही : मुनीर
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
इराण, तालिबान आणि भारतासोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या तिन्ही देशांवरून विखारी वक्तव्य केले आहे. एक पाकिस्तानी नागरिक पूर्ण अफगाणिस्तानपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यास आम्ही अफगाणिस्तानची फिकिर करणार नाही. तर इराणने पाकिस्तानच्या पाठीत खंजीत खुपसला असल्याचे उद्गार मुनीर यांनी क्षेपणास्त्रयुद्धावरून काढले. पाकिस्तानने 50 लाख अफगाण लोकांना 50 वर्षे अन्न पुरविले, परंतु आमच्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही संपवू असे मुनीर यानी टीटीपीच्या हल्ल्यांबद्दल बोलताना म्हटले आहे. बलुचिस्तानात सुरू असलेल्या उग्रवादाला दीर्घकाळापासून अफगाणिस्तानातून समर्थन मिळाले आहे. अफगाणिस्तानने कधीच मैत्री दाखविली नसल्याचा दावा जनरल मुनीर यांनी केला आहे. तालिबानने पाकिस्तानच्या दिशेने वाकड्या नजरेने पाहू नये असे मुनीर यांनी तालिबानला इशारा देत म्हटले आहे. जनरल असीम मुनीर यांनी टीटीपीसोबतची चर्चा बंदे केली आहे. मुनीर यांनी टीटीपी विरोधात कारवाई करण्यासाठी तालिबानवर दबाव आणला आहे, परंतु तालिबानने या दबावाला अद्याप जुमानले नाही. भारताने अद्याप पाकिस्तानची संकल्पनाच मान्य केली नाही. अशा स्थितीत आम्ही त्यांच्यासोबत संबंध कसे सुधारू शकतो असे मुनीर यांनी म्हटले आहे.









