उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला खुलासा
वृत्तसंस्था/ तेहरान
इराण स्वत:च्या आण्विक केंद्राला इस्रायल अन् अमेरिकेच्या हवाई हल्ल्यापासून वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत त्याने आता अण्वस्त्र निर्मितीचे काम पर्वतीय भागात भूमिगत स्वरुपात करण्यास सुरुवात केली आहे. याचा खुलासा उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला आहे.
इराणचे कामगार जागरोसच्या पर्वतांमध्ये भुयार निर्मितीचे काम करताना दिसून आले आहेत. हे ठिकण इराणचे आण्विक केंद्र नातांजपासून अत्यंत नजीक आहे. नातांजवर अमेरिका अन् इस्रायलने अनेकदा हल्ले केले आहेत. इराणला अण्वस्त्र मिळविण्यापासून रोखण्यासाठी इस्रायल अन् अमेरिका सातत्याने प्रयत्नशील आहेत.

आण्विक केंद्राला वाचविण्यासाठी नव्या प्रकल्पाला अँटी एअरक्राफ्ट बॅटरीज, फेंसिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड या प्रकल्पाला सुरक्षा पुरवत आहेत. हे भुयार 6 मीटर रुंदीचे असून इराण स्वत:च्या आण्विक केंद्राला 80-100 मीटर खोलवर तयार करत आहे. भूमिगत केंद्राला लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने जीबीयू-57 बॉम्ब तयार केला होता. हा बॉम्ब जमिनीत 60 मीटरपर्यंत जाऊ शकतो. याचा प्रभाव 80-100 मीटर खोलवर निर्मिलेल्या इराणच्या आण्विक केंद्रावर पडणार नसल्याचे मानले जात आहे.
इराणचे आण्विक केंद्राचे काम पूर्ण होणे एखाद्या दुस्वप्नासारखे असल्याचे अमेरिकेच्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. इराणला अण्वस्त्रप्राप्तीपासून रोखण्यासाठी अमेरिका सातत्याने निर्बंध लादत आहे. अलिकडेच बिडेन प्रशासनाने इराणच्या कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रावरील निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली आहे.
इराणला अण्वस्त्र प्राप्त करण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या आण्विक केंद्रांवर अनेक हल्ले झाले आहेत. नातांज आण्विक केंद्रावर स्टक्सनेट व्हायरसने हल्ला करण्यात आला होता. इस्रायल आणि अमेरिकेत तयार झालेला हा व्हायरस होता. तर इराणच्या आण्विक संशोधकांच्या हत्या घडवून आणल्याचा इस्रायलवर आरोप आहे.









