इराणच मुस्लीम जगताचे करतोय नेतृत्व
पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यानी मंगळवारी इराणचे जोरदार कौतुक केले आहे. इस्रायलसोबत संघर्षानंतर मुस्लीम देशांचा नेता म्हणून इराणची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला गुडघ्यावर आणले आहे. इराणच्या नेतृत्वाचे साहस अन् दृढनिश्चयाला मी सलाम करते. इराणच्या लोकांची ही लढाई कौतुकास्पद आहे. इराणकडे अण्वस्त्रं नाहीत, परंतु विश्वास अन् बलिदानाची इच्छाशक्ती असल्याचे उद्गार पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी काढले आहेत. इराणने अमेरिका आणि इस्रायलला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प हे शस्त्रसंधीबद्दल बोलत आहेत, याचा अर्थ आतापर्यंतच्या युद्धाचा परिणाम अमेरिका आणि इस्रायलच्या अपेक्षेच्या अत्यंत उलट आहे असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
मुस्लीम देशांकडून निराशा
या युद्धामुळे इराण हा मुस्लीम देशांचा नेता म्हणून उदयास आला आहे. परंतु अन्य मुस्लीम देशांनी फार काही केले नाही. अमेरिका हा मुस्लीम देशांवर स्वत:च्या मर्जीने हल्ले करत असतो. इराक, अफगाणिस्तान, लीबिया किंवा सीरियावर अमेरिकेने युद्ध लादले होते. परंतु यावेळी अमेरिकेला एका मुस्लीम देशावर हल्ला करण्याची पळं भोगावी लागल्याचे वक्तव्य मुफ्ती यांनी केले आहे.









