अनिश दयाळ यांची आज निवृत्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी वितुल कुमार यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वितुल कुमार हे उत्तर प्रदेश केडरचे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते सीआरपीएफचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या नववर्षात ते सध्याचे डीजी अनिश दयाळ सिंग यांची जागा घेतील.
अनिश दयाळ सिंह यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. वितुल कुमार यांच्या नियुक्तीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी अधिसूचना जारी केली. सध्याचे फोर्स प्रमुख अनिश दयाळ सिंग 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर वितुल कुमार यांच्याकडे सीआरपीएफचे प्रमुखपद सोपवले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
वितुल कुमार यांचा जन्म 3 ऑगस्ट 1968 रोजी पंजाबमधील भटिंडा येथे झाला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंग केले आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कुमार यांनी पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना 9 फेब्रुवारी 2009 रोजी उपमहानिरीक्षक, 31 डिसेंबर 2012 रोजी महानिरीक्षक आणि 1 जानेवारी 2018 रोजी अतिरिक्त महासंचालक (एडीजी) या पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची सीआरपीएफचे विशेष महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपल्या सेवाकाळात राष्ट्रपती पोलीस पदकासह अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.









