आपल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकांत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांनी अजित पवार यांच्यावर थेट आरोप करून शासकिय जमिन एका खाजगी बिल्डरला हस्तांतरीत करण्यासाठी दबाव आणल्याचे म्हटले आहे. काल पासून यासंदर्भात माध्यमांमध्ये या पुस्तकावर आणि त्यावरील मजकूरावर चर्चा होत असताना आज मीरा बोरवणकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन अजितदादांवर गंभिर आरोप केले.
मीरा बोरवणकर यांनी 2010 मध्ये पुणे पोलीस आयुक्तपदी असताना घडलेल्या एका घटनेचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली कारागृहाशेजारीची तीन एकर जागा अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप त्यांनी अजितदादा यांच्यावर केला. मात्र असे लिहितांना त्यांनी थेट अजित पवार यांचे नाव न घेता जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा उल्लेख केला आहे. तसेत या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय प्रस्तावित होते, असा दावाही मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. त्यानंतर माध्यमांत दिवसभर चाललेल्या चर्चांनंतर आज मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांवर थेट आरोप केले.
यावेळी बोलताना मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, “अजित पवार यांनी लिलाव केला नसला तरी पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करून मी कार्यभार सांभाळल्यानंतर जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना मला करण्यात आली होती. तत्कालिन पालकमंत्री अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. तसेच या जमिनीचा लिलाव झालेला आहे. आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करून जमिनीचा ताबा बिल्डरला द्या असेही त्यांनी सांगितले होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या दृष्टीने शहराच्या मध्यभागी असणारी जागा महत्त्वाची होती. कारण ती जागा पुणे पोलीस आयुक्तालय, तसेच पोलिसांच्या गृहनिर्माणासाठीही वापरता आली असती. त्यामुळे त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेवून मी हस्तांतरणाला विरोध केला.” असा खुलासा मीरा बोरवणकर यांनी म्हटले. बोरवणकरांच्या या आरोपाने अजितदादा यांच्या अडचणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे.