15 हजार कोटी रुपयांची होणार उभारणी : दिवाळीपूर्वी आणण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 12 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहेत. या कंपन्यांमार्फत आगामी काळामध्ये 15 हजार कोटी रुपयांची उभारणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याला शेअर बाजारामध्ये दबावाचे वातावरण असतानाही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून आपली नियोजित रक्कम उभारणी करण्याचे नियोजन करत आहेत. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी असून या तारखेच्या आत कंपन्या आपले आयपीओ सादर करणार आहेत. सेलो वर्ल्ड आणि ब्लू जेट हेल्थकेअर यांनी आपल्या आयपीओ सादरीकरणाची तारीख जाहीर केली आहे.
यांचे येणार आयपीओ
याच दरम्यान टाटा टेक्नॉलॉजीज, मामाअर्थची सहकारी कंपनी होनासा कंझ्युमर, एएसके ऑटोमेटिव्ह, प्रोटीन इगॉव टेक्नॉलॉजीज, फेड बँक फायनान्शिअल सर्व्हिसेस, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, फ्लेयर राइटिंग इंडस्ट्रीज आणि क्रेडो ब्रँड्स मार्केटिंग या कंपन्यांचे आयपीओ सादर केले जाणार आहेत.
यांचे आयपीओ खुले
घरगुती सामान तसेच स्टेशनरीच्या क्षेत्रामध्ये वस्तूंची विक्री करणाऱ्या सेलोवर्ल्डचा आयपीओ 30 ऑक्टोबरला खुला झाला असून एक नोव्हेंबरपर्यंत सबक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनीने समभागाची किंमत 617-648 रुपये प्रति समभाग अशी ठेवली आहे. ब्लू जेट हेल्थकेअर यांचा आयपीओ 27 ऑक्टोबरला खुला झाला आहे. या अंतर्गत 840 कोटी रुपये कंपनीला उभारायचे आहेत.
दीर्घकाळानंतर टाटाचा आयपीओ
दुसरीकडे टाटा टेक्नॉलॉजीज यांचा आयपीओ नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेअरबाजारात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहातील हा पहिला आयपीओ सादर केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. याआधी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी आयपीओच्या माध्यमातून 5500 कोटी रुपये उभारले होते. टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओअंतर्गत आपल्या समभागाची किंमत 450 ते 500 रुपये प्रति समभाग ठेवू शकते. मामाअर्थ यांची सहकारी कंपनी होनासा कंझ्युमर यांचाही आयपीओ पुढच्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत 1650 कोटी रुपये उभारण्याची तयारी करण्यात आली आहे.









