कोलकात्यात होणार पहिला व अंतिम सामना, महिला प्रिमियर लीगची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षी होणाऱ्या आयपीएलचे हंगामी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयपीएलचा उद्घाटनाचा सामना तसेच जेतेपदाचा सामना होणार आहे.
यावर्षीची आयपीएल स्पर्धा 21 मार्चपासून सुरू होईल तर 25 मे रोजी जेतेपदाची लढत होईल. त्याचप्रमाणे महिला प्रिमियर लीग (डब्ल्यूपीएल) 7 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत घेतली जाणार असल्याचे समजते. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा लिलावावेळी आयपीएलने पुढील तीन (2025-2027) मोसमासाठी ‘विंडो’ची माहिती सर्व फ्रँचायजींसोबत शेअर केली होती. 2025 साठी 15 मार्च ते 25 मे असा अवधी देण्यात आला होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत 9 मार्च रोजी होणार असल्याने दोन स्पर्धांमध्ये किमान दोन आठवड्याचे अंतर ठेवण्याचा निर्णय आयपीएलने घेतला. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक या महिन्यातच नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या परंपरेप्रमाणे विद्यमान विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर सलामीचा व अंतिम सामना घेण्यात येईल. यावर्षी हा बहुमान कोलकाताच्या ईडन गार्डन्सला मिळाला आहे. मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धा जिंकली असल्याने ईडन गार्डन्स हे त्यांचे घरचे मैदान आहे. याच मैदानावर क्वालिफायर 2 सामना होईल तर पहिले दोन क्वालिफायर सामने-क्वालिफायर 1 व एलिमिनेटर हैदराबादमध्ये खेळविले जातील.
गेल्या तीन मोसमाप्रमाणे यावेळीही एकूण 74 सामने होतील. 2022 आयपीएलमध्ये एकूण 84 सामने झाले होते. मीडिया हक्काच्या नव्या कालावधीत प्रत्येत मोसमात सामन्यांची संख्या वेगवेगळी असल्याचे टेंडरमध्ये नमूद करण्यात आले आहे. 23-24 मध्ये 74, 2025-2026 मध्ये 84 तर 2027 या वर्षी कमाल 94 सामने खेळविले जाणार आहेत.
महिलांच्या प्रिमियर लीगसाठी बीसीसीआयने आणखी दोन केंद्रांची निवड केली आहे. आता मुंबई, बेंगळूरसह बडोदा व लखनौमध्येही महिलांचे सामने खेळविले जातील. प्रत्येक केंद्रावरील सामन्यांची संख्या अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. महिला प्रिमियर लीगचे वेळापत्रकही अद्याप तयार करण्यात आले नाही. मात्र ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात होणार आहे.









