आयपीएल 16ः 72 धावांनी मात, सामनावीर बटलर, यशस्वी जैस्वाल, सॅमसन यांची अर्धशतके, चहलचे 4 बळी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादचा 72 धावांनी धुव्वा उडवित सोळाव्या आयपीएलमध्ये विजयी प्रारंभ केला. 22 चेंडूत 54 धावा फटकावणाऱया जोस बटलरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. याशिवाय चहलने भेदक फिरकीवर 4 बळी मिळविले.

सनरायजर्सकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर यशस्वी जैस्वाल, जोस बटलर व कर्णधार संजू सॅमसन या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला. या मोसमात सर्वप्रथम 200 धावांचा टप्पा गाठणारा राजस्थान पहिला संघ बनला आहे. त्यानंतर सनरायजर्सला 20 षटकांत 8 बाद 131 धावांवर रोखत राजस्थानने एकतर्फी झालेल्या या सामन्यात 72 धावांनी विजय मिळविला. यजुवेंद्र चहल व ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱयासमोर सनराजयर्सच्या फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. अब्दुल समदने सर्वाधिक नाबाद 32 तर मयंक अगरवालने 27 धावा केल्या. याशिवाय आदिल रशिदने 18, उमरान मलिकने 8 चेंडूत नाबाद 19 व हॅरी ब्रुकने 13 धावा जमविल्या. अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. चहलने केवळ 17 धावा देत 4 बळी मिळविले तर बोल्टने 21 धावांत 2, रविचंद्रन अश्विन व जेसन होल्डर यांनी एकेक बळी मिळविले.
सनरायजर्सच्या आघाडी फळीतील फक्त अगरवालने 23 चेंडूत 27 धावा फटकावत चमक दाखविली तर आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱया ब्रुकला 21 चेंडूत 13 धावा जमविता आल्या. कठीण आव्हानाचा पाठलाग करणाऱया सनरायजर्सला बोल्टने पहिल्याच षटकात दोन धक्के देताना अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांना शून्यावर बाद केले. जेसन होल्डरने स्लिपमध्ये त्रिपाठीचा अप्रतिम झेल टिपला. या धक्क्यातून सनरायजर्स अखेरपर्यंत सावरू शकले नाही. चहलच्या भेदक माऱयापुढे त्यांना निर्धारित षटकांत 131 धावांपर्यंतच मजल मारता आली.

बटलर, जैस्वालची दमदार सलामी
तत्पूर्वी, मागील वर्षीच्या उपविजेत्या राजस्थानला जोस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी चमकदार सुरुवात करून देताना 5.5 षटकांतच 85 धावा फटकावल्या. पॉवरप्लेमधील कोणत्याही संघाने नोंदवलेली ही आयपीएलच्या इतिहासातील सहावी सर्वोच्च धावसंख्या आहे. बटलरला फारुकीने त्रिफळाचीत केले त्यावेळी त्याने 22 चेंडूत 54 धावा फटकावल्या होत्या. त्यात 7 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. आणखी 54 धावांची भर पडल्यानंतर जैस्वालला फारुकीनेच अगरवालकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 9 चौकारांसह 54 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार सॅमसनने फटकेबाजीचा ओघ कायम राखत आठव्या षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. जैस्वाल बाद झाल्यानंतर राजस्थानचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले. 19 षटकांत त्यांनी 200 धावांचा टप्पा गाठला. जैस्वालने आयपीएलमधील चौथे अर्धशतक नोंदवले तर सॅमसनने 32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 55 धावा फटकावल्या. देवदत्त पडिक्कल (2), रियान पराग (7) अपयशी ठरले तर शिमरॉन हेतमेयरने 16 चेंडूत नाबाद 22 धावा फटकावल्या. सनरायजर्सच्या फझलहक फारुकी, टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2, उमरान मलिकने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 5 बाद 203 ः यशस्वी जैस्वाल 54 (37 चेंडूत 9 चौकार), बटलर 54 (22 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), सॅमसन 55 (32 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), देवदत्त पडिक्कल 2, रियान पराग 7, हेतमेयर नाबाद 22 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), आर. अश्विन नाबाद 1, अवांतर 8. गोलंदाजी ः फारुकी 2-41, टी. नटराजन 2-23, उमरान मलिक 1-32.
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 131 ः मयंक अगरवाल 27 (23 चेंडूत 3 चौकार), हॅरी ब्रुक 13 (21 चेंडूत 1 चौकार), अब्दुल समद नाबाद 32 (32 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अदिल रशिद 18 (13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), उमरान मलिक नाबाद 19 (8 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), ग्लेन फिलिप्स 8, भुवनेश्वर 6, अवांतर 7. गोलंदाजी ः बोल्ट 2-21, चहल 4-17, होल्डर 1-16, आर.अश्विन 1-27.








