कायली मेयर्सचे अर्धशतक, मार्क वूडचे 5 बळी, वॉर्नरचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात कायली मेयर्सचे शानदार अर्धशतक तसेच मार्क वूडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने विजयी सलामी देताना दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी दणदणीत पराभव केला.
लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 6 बाद 193 धावा जमवित दिल्ली कॅपिटल्स विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 बाद 143 धावा जमवल्या. डेव्हिड वॉर्नरचे एकाकी अर्धशतक वाया गेले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा के. एल. राहुल चौथ्या षटकात बाद झाला. साकारियाने त्याला झेलबाद केले. राहुलने 12 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. त्यानंतर कायली मेयर्स आणि दीपक हुडा या जोडीने संघाला सुस्थितीत नेताना दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी केली. दीपक हुडाने 18 चेंडूत 17 धावा जमविल्या. पण त्याने मेयर्सला चांगली साथ दिली. मेयर्सने 38 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांसह 73 धावा फटकाविल्या. अक्षर पटेलने त्याचा त्रिफळा उडविला. स्टोईनिसने 10 चेंडूत 1 षटकारासह 12, निकोलास पूरनने 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 तर आयुष बदोनीने 7 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. कृणाल पांड्याने 13 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. कृष्णाप्पा गौतमने 1 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 6 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सच्या डावामध्ये 16 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे खलिद अहमद तसेच चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 2 तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली संघाच्या डावाला कर्णधार वॉर्नर आणि शॉ यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने 27 चेंडूत 41 धावांची भागीदारी सलामीच्या गड्यासाठी केली. शॉ बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती सुरू झाली. मार्क वूडची शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजी तसेच त्याला आवेश खान आणि रवि बिश्नोई यांच्याकडून मिळालेल्या साथीमुळे दिल्ली संघाने 20 षटकात 9 बाद 143 धावापर्यंत मजल मारली. कर्णधार वॉर्नरने 48 चेंडूत 7 चौकारांसह 56, रॉसोने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 30, अक्षर पटेलने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, शॉ ने 9 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमवल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. लखनौ संघातर्फे मार्क वूडने 14 धावात 5 तर आवेश खानने 29 धावात 2 तसेच बिश्नोईने 31 धावात 2 गडी बाद केले. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या पहिल्या डावात 19 व्या षटकात खलिल अहमदच्या जागी अमन हकीम खान इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आला. तर लखनौ संघाच्या डावामध्ये शेवटच्या चेंडूसाठी आयुष बदोनीच्या जागी के. गौतमला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकात 6 बाद 193 (राहुल 8, मेयर्स 73, दीपक हुडा 17, कृणाल पांड्या नाबाद 15, स्टोईनिस 12, पूरन 36, बदोनी 18, गौतम नाबाद 6, अवांतर 8, खलिल अहमद 2-30, साकारिका 2-47, अक्षर पटेल 1-38, कुलदीप यादव 1-35), दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 9 बाद 143 (डेव्हिड वॉर्नर 56, शॉ 12, रॉसो 30, अक्षर पटेल 16, मार्क वूड 5-14, बिश्नोई 2-31, आवेश खान 2-29).








