वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामाला 31 मार्चपासून प्रारंभ होत असल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना विद्यमान विजेता गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे.
2023 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा देशातील 12 ठिकाणी खेळवली जाणार असून 31 मार्चचा सलामीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तसेच या स्पर्धेतील अंतिम सामना 28 मे रोजी मोदी स्टेडियमवरच खेळवला जाईल. या स्पर्धेतील सामने अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैद्राबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गोहत्ती, धर्मशाला याठिकाणी आयोजित केले आहेत. 2019 नंतर प्रथमच आयपीएल स्पर्धा भारतामध्ये संपूर्णपणे घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार आहे. या 14 सामन्यापैकी 7 सामने संबंधित संघाच्या घरच्या मैदानावर तर उर्वरित सात सामने इतर ठिकाणी होतील.
बीसीसीआयतर्फे पहिल्यांदाच यावेळी भारतात महिलांची प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धा भरवली जात आहे. ही स्पर्ध 26 मार्चला संपल्यानंतर 5 दिवसांच्या अंतराने पुरुषांच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 31 मार्च ते 21 मे दरम्यान होणाऱ्या 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. एप्रिल महिन्याचा प्रारंभ विक एंड सुटीने होत असल्याने 1 एप्रिल रोजी दोन सामने आयोजित केले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स तसेच लखनौ सुपर जायंटस् आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हे सामने 1 एप्रिल रोजी होतील. सनरायजर्स हैद्राबाद व राजस्थान रॉयल्स त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामने रविवार 2 एप्रिल रोजी आयोजित केले आहेत. यापैकी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत. अ गटात मुंबई इंडियन्स, कोलकात नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपरजायंटस् यांचा तर ब गटात चेन्नई सुपरकिंग्ज, सनरायजर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने जेतेपद मिळवताना राजस्थान रॉयल्सचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.









